पिंपळगाव बसवंत : महामार्गावरून सर्रासपणे अवैधपणे उसाची वाहतूक करणाºया ट्रॅक्टर ट्रॉलीचे अंबिकानगर येथील देवी मंदिरासमोर चाक निखळल्याने ट्रॉलीसह ट्रॅक्टर उलटला. या अपघातामुळे वाहतूक कोंडी होऊन खोळंबा झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी, ऊस वाहतुकीचे नियम धाब्यावर बसल्याचे समोर आले आहे.दैव बलवत्तर म्हणून रस्त्याच्या कडेने जाणारे नागरिक थोडक्यात बचावले. क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरल्याने वजन अधिक झाल्याने ट्रॉलीचे चाक निखळल्याचे काही ट्रॅक्टर चालकांनी सांगितले. नियमबाह्य ऊस वाहतुकीमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असल्याने तालुक्यातील विविध भागातून उसाची वाहतूक सुरू आहे. मात्र वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सर्रास दोन ट्रोली जोडून उसाची वाहतूक केली जात असल्याचे चित्र निफाड तालुक्यातील विविध रस्त्यांवर दिसत आहे.निफाड-पिंपळगाव रस्त्यावर तीन वर्षांपूर्वी ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टर ट्रॉलीचे अतिवजनामुळे चाक निखळल्याने ट्रॉली उलटून उसाच्या ढिगाºयाखाली दोन जण दाबले गेले होते. दैव बलवत्तर म्हणून ते वाचले. हा प्रसंग घडूनही या रस्त्यावरून दोन ट्रॉलींसह ऊस वाहतूक सर्रास सुरू आहे. त्याची पुनरावृत्ती वर्षाच्या प्रारंभीच झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. संबंधित विभागाने वेळीच यावर निर्णय घेणे गरजेचे आहे.या नियमांमुळे अवैध वाहतूकवाहतुकीनुसार ट्रॅक्टरमालकाला कारखान्याकडून भाडे अदा करण्यात येते. म्हणून ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरच्या क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरतात. त्यामुळे सर्रास दोन ट्रॉलींचा वापर करण्यात येतो. एका ट्रॉलीची क्षमता १४ ते १५ टन इतकी असते. परंतु, यामध्ये १८ ते २० टन भरण्यात येतो. नफा कमाविण्यासाठी बेकायदेशीरपणे अधिक ऊस भरला जातो. हे प्रकार जीवघेणे ठरत आहेत. त्यासाठी विनापासिंग ट्रॉलींचा वापर करण्यात येतो.
वाहतूक पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने अवैध ऊस वाहतूक थांबण्याचे नाव घेत नाही. यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच रस्त्यांचीही वाट लागत आहे. कारवाईसाठी वाहतूक विभाग मोठी दुर्घटना होण्याचा मुहूर्त पाहत आहे का, असा सवाल नागरिकांनी केला आहे. अंबिकानगर भागात झालेल्या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाल्याने वाहधारकांनी संताप व्यक्त केला आहे.अनेक ट्रॅक्टर टॉलींना नंबरच नसतो. यामुळे अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पसार होतात. दोन ट्रॉली एका ट्रॅक्टरला जोडून त्यामध्ये उसाची वाहतूक करणे बेकायदेशीर आहे. मात्र सर्रासपणे ही वाहतूक सुरू असून, आरटीओकडून ग्रामीण भागातील रस्त्यांवर सुरू असलेली ही जीवघेणी वाहतूक बंद का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.- उद्धवराजे शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, पिंपळगाव बसवंत
रस्त्यावरील अवैध वाहतूक रोखण्याची व संबंधितांवर कारवाई करण्याची जबाबदारी आरटीओ विभागावर आहे. पण नियम धाब्यावर ठेवून ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीतून बेकायदेशीरपणे कारखान्याकडे पोहचविला जात आहे. यामुळे अनेक अपघातात घडत असून, पोलीस व आरटीओ विभागाने जागे होण्याची गरज आहे.- रोहित कापुरे, वाहनधारक, पिंपळगाव बसवंत