इंदिरानगर : मुंबई नाका नासर्डी नदीपूल ते पाथर्डी फाटा समांतर रस्त्यावरून रिक्षाचालक अवैध वाहतूक करीत आहे. त्यामुळे जीवघेणी स्पर्धा किती दिवस सुरू राहणार, असा उपरोधिक सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.मुंबई-आग्रा महामार्ग समांतर रस्त्यालगत भारतनगर, दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर, गणेशनगर, राणेनगरसह विविध उपनगरे आहेत. यामध्ये मोठी लोकवस्ती आहे. त्यामधील शेकडोच्या संख्येने असलेला विद्यार्थीवर्ग, नोकरदार, व्यावसायिक व ज्येष्ठ नागरिक शहरात कामानिमित्त ये-जा करत असतात. त्यासाठी शहर बससेवेचा लाभ घेतात. परंतु लोकवस्तीच्या मानाने बसफेऱ्या अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे वेळेवर बससेवा नसल्याने बहुतेक नागरिक रिक्षाचा लाभ घेतात. मुंबई नाका ते पाथर्डी फाटा समांतर रस्त्यावर सुमारे ८० रिक्षा चालतात. परंतु या रिक्षांमध्ये चालकाजवळ तीन ते चार आणि पाठीमागे सहा ते सात प्रवासी बसलेले असतात. तसेच बेफान वेगाने चालणाऱ्या जीवघेण्या अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांमुळे अनेकवेळा लहान-मोठे अपघात झाले आहेत. तरीही शहर वाहतूक पोलीस विभाग सुस्त आहे. त्यांच्या या भूमिकेविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)
मुंबई नाका-पाथर्डी फाटा समांतर रस्त्यावर अवैधरीत्या वाहतूक
By admin | Published: August 27, 2016 10:44 PM