नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. अनेक बडे नेते अजित पवार यांच्यासोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासमवेत काही मोजकेच नेते आणि आमदार उरले आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी आजपासून आपल्या झंझावाती दौऱ्याला सुरुवात केली. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांची छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात जाहीर सभा झाली. मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात जुन्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या सभेला गर्दी केली होती. यावेळी, शरद पवारांनी नाशिकरांना भावनिक साद घातली.
नाशिक दौऱ्यावर निघतानाच शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजले असून, सुप्रिया सुळे यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला. त्यानंतर, येलवल्याही शरद पवारांचे जोरात स्वागत करण्यात आले. यावेळी, सभेतील भाषणात शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या कोणावरही टीका केली नाही. याउलट नाशिककरांना भावनिक साद घातली. मी कोणावरही टीका करायला आलो असून मी तुमची माफी मागायला आलोय, असे शरद पवार म्हणाले. दरम्यान, आपल्या भाषणात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज दिलं, तर वयावरुन विचारणा करणाऱ्यांनाही फटकारलं.
नाशिकच्या भूमिचा इतिहास सांगत, स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि शरद पवारांचे असलेले ऋुणानुबंध सांगत पवारांनी भाषणाला सुरुवात केली. या भूमीतील लोकांवर अडचणी असतील, संकटे असतील, दुष्काळ असेल, पण ते स्वाभिमान कधी सोडणार नाहीत. या स्वाभिमानी लोकांना पुन्हा शक्ती देण्याची गरज आहे. त्यासाठी आज आम्हा लोकांना अधिक जबाबदारी घ्यावी लागेल, असं शरद पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले.
''आज मी या ठिकाणी टीका करायला नाही तर माफी मागण्यासाठी आलो आहे. मी माफी यासाठी मागतोय कारण माझा अंदाज कधी फारसा चुकत नाही. पण, इथे माझा अंदाज चुकला. माझा अंदाज चुकला'', यातून तुम्हाला यातना झाल्या, त्यामुळे मी तुमची माफी मागतोय, असं शरद पवार यांनी म्हटलं. तसेच, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची संपूर्ण सत्ता कामाला लावावी आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्टचार केलेल्या नेत्यांवर कारवाई करावी, असे चॅलेंजच पवारांनी मोदींना दिलं.