नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार डॉक्टरांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकिय आयोग विधेयकाविरुध्द इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने (आयएमए) राष्ट्रव्यापी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात नाशिक आयएमएनेही सहभाग घेतला असून शहरातील दोन हजार तर जिल्ह्यातील पाचशे असे एकूण अडीच हजार डॉक्टर आज काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहे.आधुनिक वैद्यकशास्त्राचे प्रतिनिधीत्व करणा-या आयएमएने या विधेयकाला तीव्र विरोध दर्शविला आहे. खासगी वैद्यकिय महाविद्यालये सुरू करण्यासाठी असलेल्या सर्व अटी या विधेयक मंजूरीत रद्द होणार आहे. महाविद्यालयांचा मनमानी कारभार वाढून बोगस पदवीप्रदान डॉक्टरांची संख्या वाढणार, नियम भंग करणा-या डॉक्टरांना ५ कोटी ते १०० कोटी दंडाची तरतुद असल्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळेल, वैद्यकिय शिक्षण महागडे होऊन त्यावर धनदांडग्यांची मक्तेदारी होईल. केवळ पाच राज्ये प्रतिनिधीत्व असतील उर्वरित सर्व २९ राज्ये विन प्रतिनिधीत्व चालतील. सध्याची राज्य वैद्यकिय परिषदांची स्वायत्तता संपुष्टात येईल, विद्यापीठे नावापुरती उरतील. एकूणच हे विधेयक खासगी व्यवस्थापनाच्या सोईचे आहे. यामुळे आयएमए या विधेयकाला विरोध दर्शवित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.एकूणच आयएमएचे सर्व सभासद असलेल्या डॉक्टरांनी एकूण बारा तासांचा लाक्षणिक संप करत ‘काळा दिवस’ पाळला आहे. संध्याकाळी सहा वाजेपासून पुढे सर्व डॉक्टरांकडून नियमितपणे बाह्यरुग्ण तपासणीला सुरूवात होणार असल्याची माहिती आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आयएम कार्यालयाच्या आवारात निदर्शनेआयएमच्या सदस्यांनी एकत्र येत येथील शालिमारच्या कार्यालयाच्या आवारात राष्ट्रीय वैद्यकिय आयोगाचा निषेध व्यक्त केला.