नाशिक : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अभाविपच्या नाशिक शाखेच्या माध्यमातून १५ हजार घरांमध्ये भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर अभाविपतर्फे ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत असून, १५ ऑगस्टला हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री विराज भामरे व महानगरमंत्री सिद्धेश खैरनार यांनी दिली.
अभाविपतर्फे राबविण्यात येत असलेल्या या अभियानात जिल्ह्यात सामूहिक ध्वजारोहण, तिरंगा फेरी, भारतमाता प्रतिमा पूजन, घरावर तिरंगा ध्वज लावणे अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ हजार घरांमध्ये भारतमातेचे प्रतिमा पूजन करणार असून, यात नाशिक जिल्ह्यातील २०६ कार्यकर्ते सहभागी असणार आहेत. या अभियानात एक कार्यकर्ता आपल्या परिसरातील शंभर घरी संपर्क साधून भारतमातेची प्रतिमा व अभाविपचे माहितीपत्रक वाटणार आहे व या अभियानाची माहिती सांगत त्यांना सामील करून घेणार आहे. सोबतच अभाविप नाशिकचे कार्यकर्ते बसस्थानक, ट्रॅफिक सिग्नल, महाविद्यालये, कार्यालये आदी विविध ठिकाणी वाटप करणार आहेत. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करू इच्छिणाऱ्या नागरिकांना अभाविपकडून प्रतिमाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आगामी वर्षभरात अभाविप संपूर्ण नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असून, पुढच्या १५ ऑगस्टपर्यंत अभाविप नाशिक ७५ ह्जार घरांमध्ये भारतमातेच्या प्रतिमांचे वाटप करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी अभाविपचे हर घर भारतमाता, घर घर भारतमाता अभियानाचे प्रमुख श्रेयस पारनेरकरही उपस्थित होते.