नाशिक : कोरोना ही सर्वांची एकत्रित लढाई असून, त्यात आम्ही शंभर टक्के योगदान देतच आहोत. मात्र, जिल्ह्यामधील सर्व कोविड हॉस्पिटल्सना ऑक्सिजन पुरवठा नियमित होण्याची नितांत गरज आहे. रेमडेसिविर औषध तातडीने उपलब्ध होण्याची गरज असल्याने या बाबींची तातडीने उपलब्धता व्हावी, असे साकडे आयएमएच्या वतीने जिल्हा आणि मनपा प्रशासनाला घालण्यात आले आहे.
कोरोना रुग्णांना बरे करून व कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी, सध्याच्या परिस्थितीत नाशिकमधील डॉक्टर्स, इतर आरोग्य कर्मचारी व रुग्णालये सर्व शक्तिनिशी प्रयत्न करीत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. डॉक्टर आहे मात्र पेशंटच्या उपचारासाठी ऑक्सिजन उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे. त्याआधीच काही रुग्णालयात ऑक्सिजनअभावी काही रुग्णांना दुसरीकडे हलवावे लागले आहे. ऑक्सिजनअभावी नवीन रुग्ण दाखल करण्यात अडचणी आहेत. एखादा रुग्ण ऑक्सिजनअभावी दगावल्यास खूप गंभीर परिस्थिती निर्माण होईल, अशा परिस्थितीत रुग्णालये चालवणे कठीण असल्याने कोविड उपचारांसाठी अत्यावश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरेशा प्रमाणातील पुरवठा लवकरात लवकर उपलब्ध व्हावा, अशी मागणी आयएमएसह समस्त वैद्यकीय संघटनांकडून मागणी होत आहे. सध्या अनेक हॉस्पिटल्सना उपलब्धता कमी असल्याने अवाजवी दराने जेवढा मिळेल तेवढा ऑक्सिजन घ्यावा लागत आहे तसेच अत्यावश्यक अशा रेमडेसिविर औषधांचीदेखील मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत असल्याने या बाबींचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच एखादी डॉक्टर पेशातील व्यक्ती अशा कृष्णकृत्यात सहभागी असेल तर तिला शिक्षा झालीच पाहिजे. वैद्यकीय समुदाय अशा प्रवृत्तींचा तीव्र निषेध करतो आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीदेखील आयएमएच्या वतीने डॉ. हेमंत सोननीस आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.