लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात धोकादायक जैविक कचरा, वापलेले हॅण्डग्लोव्हजसह पीपीई किटमुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच चांदवड उपजिल्हा रुग्णालयाचे प्रशासन खडबडून जागे झाले व त्यांनी तातडीने स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून आवाराची स्वच्छता करुन घेतली.
पंधरा दिवसांपूर्वी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमधील स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणात घाण व दुर्गंधी असल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. याबाबत आमदार डॉ. राहुल आहेर यांनी सर्व अधिकाऱ्यांची या संदर्भात बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या असताना उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात वापरलेली पी. पी. ई. किट, हॅण्डग्लोव्हज्, औषधाचे खोके, जेवणाचे द्रोण, डिश व इतर कचऱ्याचे साम्राज्य दिसून आले. सफाई कामगार नेमणुकीसाठी नव्याने जाहिरात काढण्यात आली होती. मात्र, त्याला कुणीही प्रतिसाद दिला नाही. यामुळे कोविड सेंटरमध्ये सफाईचे काम करण्यास काेणीही तयार नसल्याची बाब उघडकीस आली आहे. दरम्यान, कोविड सेंटरला सफाई सेवा देणाऱ्या पुरवठादारांच्या अडचणी प्रशासनाने समजून घेऊन या अडचणीच्या कामात काम करुन घ्यावे, अशी मागणी अनेकांनी केली आहे.
------------------------------------------------------
चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात कचरा स्वच्छता करताना स्वच्छता कर्मचारी. (१२ चांदवड १)
===Photopath===
120521\12nsk_12_12052021_13.jpg
===Caption===
१२ चांदवड १/२