महावितरणकडून १४ एप्रिल ते ६ डिसेंबर या कालावधीत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना घरगुती नवीन वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी अर्जदारांना वीज जोडणीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्याची सोय आहे. लाभार्थींना या योजनेमधून घरगुती वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणकडे एकूण ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम देखील पाच समान मासिक हप्त्यांमध्येच वीज बिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
महावितरणकडून वीज जोडणीचा अर्ज मंजूर झाल्यानंतर विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसांमध्ये वीज जोडणी कार्यान्वित केली जाणार आहे. ज्या ठिकाणी वीज जोडणीसाठी विद्युत पायाभूत सुविधा तयार करावी लागणार आहे, अशा ठिकाणी महावितरणकडून स्वनिधी किंवा जिल्हा नियोजन विकास समितीचा निधी (विशेष घटक योजना तथा आदिवासी उपाययोजनासहित) किंवा कृषी आकस्मिकता निधी व इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीमधून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.