मालेगाव : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अवकाळी पावसाची नुकसान भरपाई, पीक विम्यासह विशेष अर्थसाहाय्य योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वितरित करण्यात आलेल्या रकमा आठवडाभरात शेतकऱ्यांना वाटप करण्याचे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
खरीप हंगामाच्या अनुषंगाने पीक कर्ज वाटपाची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली. यावेळी भुसे बोलत होते. याप्रसंगी उपमहापौर नीलेश आहेर, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, सहायक निबंधक श्री. बदनाळे, अग्रणी बँकेचे प्रमुख शेखर जिल्हा बँकेचे प्रशासकीय व्यवस्थापक आरीफ, स्टेट बँकेचे व्यवस्थापक शपांडे यांच्यासह सर्व बँकांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी बांधव शेतीच्या मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यांना आज आर्थिक मदतीची गरज असून शासनामार्फत नुकसान भरपाईपोटी वितरित करण्यात आलेल्या रकमेवर कॅपिंग लावून शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीपासून वंचित ठेवल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब योग्य नसून पुढील आठ दिवसांत शेतकऱ्यांना मदतीच्या रकमांचे वाटप करण्याच्या सूचना मंत्री भुसे यांनी यावेळी दिल्या. जिल्हा बँकेच्या सर्व शाखाप्रमुखांनी लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना याबाबत अवगत करण्याबाबतही निर्देशित केले.
----------------
किमान ७५ कोटींचे पीक कर्ज वाटप करावे
कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच बळीराजाही प्रभावित झाला आहे. या संकटकाळात येत्या हंगामासाठी त्याची आर्थिक मदतीची गरज ओळखून जिल्हा बँकेसह सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात पीक कर्जाचे वाटप करण्याचे आवाहन करताना यावर्षी तालुक्यात किमान ७५ कोटींचे पीक कर्ज वितरित करण्याच्या सूचनाही मंत्री भुसे यांनी दिल्या.