नाशिक- पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करीत शेकडो नागरिकांनी आपल्या घरात किंवा अंगणातच मूर्तींचे विसर्जन केले. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विरघळण्यासाठी नाशिक महापालिकेकडून आता पर्यंत 5.2 टन अमोनियम बाय कार्बोनेट पावडरचे वितरण करण्यात आले आहे.
नाशिक मध्ये घरगुती स्वरूपात गणेशोत्सव साजरा करताना प्रामुख्याने शाडू मातींच्या मूर्तींचा वापर केला जातो. त्यामुळे यंदाही अशा मूर्तींच्या विक्रीला मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक पर्यावरण प्रेमींनी तर तुरटी आणि गोमय तसेच मातीपासून तयार केलेले गणपतीच्या मूर्तींची स्थापना केली आहे. परन्तु आकर्षक आणि सुबक म्हणून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती देखील घरात आणल्या जातात. यातील शाडू मातीच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळत असल्या तरी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसाठी महापालिकेच्या वतीने अमोनियम बाय कार्बोनेटची पावडर उपलब्ध करून दिली जाते.
यंदा आता पर्यंत 5 टन पावडरचे वितरण झाले असून अजूनही नागरिकांकडून मागणी होत आहे. गेल्या वर्षी 4. 2 टन पावडर देण्यात आली होती. यंदा एक टन आधिक पावडर देण्यात आली असून त्यामुळे गत वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पर्यावरण पूरक पद्धतीने मूर्ती विसर्जन घर किंवा अंगणात झाल्याची माहिती नाशिक महापालिकेचे पर्यावरण आधिकारी शिव नारायण वंजारी यांनी लोकमतशी बोलताना दिली.