आझादनगर : मालेगाव शहरातील मुस्लीम बांधवांकडून मोहरमनिमित्ताने शहरातून नियोजित मार्गाने पारंपरिक पद्धतीने शांततेत ताबुतांची विसर्जन मिरवणूक पार पडली. यावेळी सुमारे लहान-मोठे मिळून सुमारे ३०० ताबुतांचे गिरणा-मोसमच्या संगमावर विसर्जन करण्यात आले. यानिमित्ताने शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. मुस्लीम बांधवांच्या शिया व सुन्नी पंथाकडून मुस्लीम प्रथम हिन्याच्या ११ तारखेस हजरत इमाम हसन-हुसैन यांच्या हौतात्म्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी मोहरम साजरा करण्यात येतो. शिया पंथाकरवी मातम, पंजा मिरवणूक, जळत्या विस्तवावर चालून मोहरम साजरा करण्यात येतो. तर सुन्नी पंथाकडून रोजा (उपवार) करण्यात येऊन नमाज अदा केली जाते. तसेच ठिकठिकाणी शरबतचे वाटप केले जाते. मोहरमच्या ९, १०, ११ तारखेस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते जाते.रविवारी सकाळी नऊ वाजेपासूनच ताबूत विसर्जननिमित्ताने मुस्लीम बांधव शहरातील आपापल्या नियोजित मार्गाने चंदनपुरी गेट येथे एकत्र जमले. तेथून कल्लूकुट्टी मार्गाने झांजेश्वर मंदिरमार्गे गिरणा-मोसमच्या संगमावर ताबुतांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी चंदनपुरी गेट ते विसर्जन स्थानापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा खेळणींची दुकाने थाटली होती. ताबूत विसर्जन मार्गावर वाहनांचा अडथळा होऊ नये म्हणून ठिकठिकाणी संरक्षक जाळ्या लावून रस्ते बंद करण्यात आले होते. चंदनपुरी पोलीस चौकी येथे राष्ट्रीय एकात्मता समिती व शहर शांतता समिती सदस्यांसह अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ताबूतांचे विसर्जन सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होते. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी स्त्री-पुरुष, अबालवृद्धांनी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
मालेगावी ताबुतांचे विसर्जन
By admin | Published: October 25, 2015 10:36 PM