नाशिक : आयुर्वेदात प्रत्येक ऋतूप्रमाणे दिनचर्या आणि आहाराची जोड देण्यात आली आहे. कारण आहारावरच आपली रोगप्रतिकारशक्ती अवलंबून असल्याचे मत आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. विक्रांत जाधव यांनी व्यक्त केले.
डिजिटल वसंत व्याख्यानमालेत त्यांनी 'ऋतुमान आणि आहार' या विषयावर सोळावे पुष्प वैद्य डॉ. जाधव यांनी गुंफले. वसंतराव नेवासकर स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानात डॉ. जाधव यांनी, कोरोना परिस्थिती, प्रत्येक ऋतूचे मानवी जीवनाशी निगडित असलेले महत्त्व, आहार आणि विहार आदी मुद्द्यांचा परामर्श घेतला.
प्रत्येक ऋतूचा प्रभाव आरोग्यावर होत असतो. ऋतूबदल होत असताना आहाराचे परिणामही बदलतात आणि रोगप्रतिकारक्षमतेस हे ऋतू कारणीभूत ठरतात. वसंत ऋतूमध्येच कोविडने जन्म घेतला. हिवाळ्यात शारीरिक बल उत्तम असते, ते बल सहाही ऋतूत निरोगी राहण्यासाठी क्षमता देते. मात्र या वातावरणात कफवर्धक आहार टाळायला हवा, असा सल्ला डॉ. जाधव यांनी दिला.
पालेभाज्या संख्यात्मकदृष्ट्या कॅलरीज् वाढवतात, मांसाहाराचे गुणधर्म वसंत ऋतूत शरीराला लागू होत नाहीत, पण भात मात्र बलकारक ठरतो, असेही जाधव यांनी सांगितले. ग्रीष्म ऋतूमध्ये फळांचा वापर वाढवावा, कोकमही पाचक असते, तर नारळपाणी बल आणि शीतलता देते. मसाल्यांध्येही हीच गुणवैशिष्ट्ये असल्याचे नमूद करून डॉ. जाधव यांनी मांस जड असल्याने ते टाळायला हवे, असेही स्पष्ट केले. कोविडच्या परिस्थितीत शरीरप्रकृती उत्तम ठेवावी. पावसाळ्यात रानभाज्या कटाक्षाने खाव्यात. कडधान्यांचा आहारात वापर असावा. उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊ नये. हा पदार्थ जड असल्याने शास्त्रकारांना हे अभिप्रेत नसल्याचे मत डॉ. जाधव यांनी नोंदविले.
यावेळी बांधकाम व्यावसायिक अरुण नेवासकर उपस्थित होते. याप्रसंगी मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर आभार चिटणीस संगीता बाफना यांनी मानले.
----------------------------
आजचे व्याख्यान
वक्ते : डॉ. डी. एल. कऱ्हाड
विषय : कामगार आणि नोकरदारांपुढील आव्हाने
------------
फोटो
१६डॉ. जाधव