नाशिक : पावसाळा आला की सगळीकडे तापाची साथ पसरते. अर्थात वातावरणातील बदल याला कारणीभूत असतात. आपल्या शरीराला वातावरणातील बदलांशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. कधी पाऊस, कधी ऊन, कधी ढगाळ वातावरण आणि हवामानातील बदलामुळे पावसाळ्यात सर्वच वयोगटात ताप येण्याचे प्रमाण वाढते. हा ताप वेगवेगळ्या प्रकारचा असतो. संसर्गजन्य तापाखेरीज मुदतीचा ताप, तीन दिवसांत जाणारा ताप, अंगदुखीनंतर येणारा ताप असे तापाचे वेगवेगळे प्रकार आहेत. ताप हा अनेकदा जंतुदोषामुळे येतो. लहान मुलांना येणारा ताप हा बहुधा संसर्गाचा ताप असतो, तर मोठ्या व्यक्तीमध्ये बारीक तापातून मुदतीचा दीर्घ काळ लांबणारा ताप असतो.
हवामानातील बदल व ताप पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर तापाची साथ अधिक जोरात असते. हवामानातील बदलामुळे, दूषित पाणी, अस्वच्छता, साचून राहिलेल्या पाण्यामुळे संसर्गजन्य तापाचे प्रमाण वाढते. तापाचे वारंवार येणारा, कमी-जास्त होणारा आणि मुरलेला ताप असे ढोबळमानाने तीन प्रकारांत वर्गीकरण करता येते. कमी-जास्त होणारा ताप हा दीर्घकाळ राहतो. तो चढ-उतार करतो. कावीळ, विषमज्वर या प्रकारात तो सर्रास आढळतो. मलेरिया, न्यूमोनिया, मूत्रपिंडाचा दोष किंवा एखाद्या छोट्या गाठीमुळे येणाऱ्या तापामध्ये एकदम थंडी वाजून येते. हा ताप पूर्ण उतरतो आणि नंतर खूप चढतो. यात आधी थंडी वाजते, मग ताप येतो. खूप दिवस टिकणाऱ्या तापाला बारीक ताप असे म्हणतात. जुन्या दुखण्यांमधील तापाचे प्रमाण पावसाळ्यात पूर्वी वाढत असे. मात्र, आता वैद्यकीय उपचारांमुळे तापाचे वेळीच निदान होऊन तो बरा होण्याचे प्रमाण वाढले आहे.
उपचाराचा पहिला टप्पा
थोडासा ताप असेल तर कोमट पाण्याने अंग पुसून ताप कमी करता येतो. कोलन वॅाटर वा गार पाण्याच्या घड्या कपाळावर ठेवाव्यात. एका दिवसात या प्राथमिक उपायांनी बरे न वाटल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते. ताप दोन ते तीन दिवस टिकला तर लक्षणानुरूप डॅाक्टरांच्या सल्ल्याने रक्त, तसेच अन्य तपासण्या करून घ्याव्यात.
लक्षणे आणि निदान
तापात अंगाला सूज येणे, घसा दुखणे, अंगदुखी होणे, लघवी पिवळी होणे, मान सतत दुखणे, पोटात जळजळ होणे अशी लक्षणे आढळतात. दूषित पाण्याने होणाऱ्या संसर्गातील तापात सतत पातळ शौचास होणे, पोटात मुरडा येऊन घेरी आल्यासारखे वाटणे ही लक्षणेही तीव्र असतात. तापातील ही लक्षणे डॅाक्टरांना सांगायला हवीत. कारण त्यामुळे तापाच्या प्रकाराचे निदान सोपे जाते.
डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
पावसाळ्यात उन्हाने येणाऱ्या तापाला आजारांवर काही साधेसोपे घरगुती उपचार सुचविले आहेत. या उपचारांच्या मदतीने भारतातील लोक संक्रमणापासून आणि डेंग्यू, मलेरिया किंवा व्हायरल तापासारख्या आजारांपासून दूर राहू शकतील. हंगामी तापाच्या लक्षणांमध्ये श्वास घेण्यात अडचण, नाक बंद होणे, खोकला, अंगदुखी होणे, डोकेदुखी, स्नायूंमध्ये ताण निर्माण होणे यासारखी लक्षणे दिसू लागल्यास तात्काळ घरगुती उपचार घ्यावेत, जर त्रास वाढतच गेला, तर अजिबात वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
इन्फो
काही प्राथमिक उपाययोजना
हवामानातील बदलाला जेव्हा शरीर अनुकूल नसते, तेव्हा शरीराला ताप, सर्दी, खोकला यासारख्या सामान्य आजारांना सामोरे जावे लागते. या शिवाय अन्य जंतू आणि विषाणूपासून होणाऱ्या आजारांचासुद्धा धोका असतो. त्यामुळे काही उपाययोजना आवश्यक असतात. ज्या जनतेला तापाच्या आजारापासून दूर ठेवतात. हे उपाय केवळ तापच नाही, तर सर्दी, खोकला आणि तत्सम सर्व आजारांपासून तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतात. त्यात हळदीचे दूध, पाणी उकळून पिणे, थोडेसे कोमट पाणी पिणे, आवश्यक असते.