सटाणा : महाराष्ट्रात हाथरस सारखी घटना घडू नये आाणि नराधमांना कायद्याचा वचक बसावा यासाठी आंध्रप्रदेश सरकारप्रमाणे राज्यात तात्काळ ‘दिशा कायदा’ लागू करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष किर्ती जाधव यांनी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे व पोलीस आयुक्त पांडे यांची मंगळवारी (दि. ६) भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे, हाथरसमधील सामूहिक बलात्काराची घटना माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी नराधमांकडून महिला व युवतींवर अत्याचाराच्या घटना घडत असतात. नराधमांमुळे राज्यातील महिला व युवती सुरिक्षत नाहीत. अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयात वर्षानुवर्ष तपास आणि सुनावणी सुरु असते. त्यामुळे गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहिलेला नाही. तसेच बलात्कार प्रकरणातील पीडितेला योग्य न्याय मिळण्यास मोठा कालावधीही लागतो. त्यामुळे महाराष्ट्रातही आंध्रप्रदेशप्रमाणे कठोर कायदा लागू करावा अशी जनतेची मागणी आहे. यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष अविनाश काजळे, उपाध्यक्ष गणेश गायधनी, इगतपुरी तालुकाध्यक्ष सतीश जाधव, संकेत भंगाळे, घनश्याम जाधव, विद्या मानकर, वंदना सोनवणे, आशा भदाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.कसा आहे दिशा कायदा?बलात्कार प्रकरणातील खटल्यांचे निकाल जलद लागावे यासाठी आंध्रप्रदेश सरकारने ऐतिहासिक दिशा कायदा केला आहे. या कायद्यानुसार बलात्काराच्या गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा आणि एकवीस दिवसांच्या आत अशा प्रकरणांचा निकाल देण्याची तरतूद आहे. हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेला पोलिसांनी ‘दिशा’ नाव दिल्याने या कायद्यालाही दिशा असे नाव देण्यात आले आहे.