नाशिक : कोविड-१९ च्या काळात आरोग्य शास्त्रांतील विद्यार्थ्यांचे कार्य महत्वपूर्ण असून विद्यार्थी आणि प्रध्यापकांनी अधिकाधिक संशोधन करून जागतिक स्तरावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ठसा उमटविणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विसावा दीक्षांत सोहळा शुक्रवारी (दि.२९ ) ऑनलाईन पद्धीतीने पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यापीठ विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही.कळसकर आदी उपस्थित होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींने समाजाचा विकास होतो. त्यामुळे या गोष्टी दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी विद्यापीठाने प्रयत्नशिल रहावे. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आरोग्य क्षेत्रात जास्तीत जास्त संशोधन कार्य करुन जागतिक स्तरावर विद्यापीठाचा ठसा उमटविण्याचे आवाहनही त्यांनी केले. तर कुरुगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा सादर करतानाच विद्यापीठ आवारात लवकरच विविध वैद्यकीय अभ्यसक्रमांचे महाविद्यालय सुरू होणार असल्याचे सांगितले.
महाविद्यालयाचा प्रस्ताव अंतीम टप्प्यात विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी निगडीत असलेले प्रलंबित अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते लवकरच मार्गी लागतील. विद्यापीठ आवारात लवकरच वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी अभ्यासक्रमाची विद्यापीठाची महाविद्यालये सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत. याबाबत शासनाकडे कार्यवाही सुरु असून काम अंतीम टप्प्यात आहे. - डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू
८५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तिघांना पीएचडी.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील उत्तीर्ण पात्र विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखांच्या पदवीका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या ८ हजार ६४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यात वेगवेगळ्या विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना ८५ विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने सुवर्णपदक व संशोधन पूर्ण केलेल्या ३ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली.