नाशिक : किरकोळ बाजारात कांदा भावाने किलोमागे शंभरी गाठली असतानाच, सोमवारी कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव व येवला येथील बड्या कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर खात्याने अचानक धाडी टाकल्या. या धाडसत्रामुळे लासलगावी शेतीमालाचे लिलाव बंद पडले.गेल्या काही दिवसांपासून कांदा भावाने उच्चांक गाठला आहे. किरकोळ बाजारात कांदा तब्बल ८० ते १०० रुपये किलोने विक्री होत आहे. त्यामुळे सामान्य ग्राहक मेटाकुटीला आला आहे. त्यातच कांदा साठेबाजीच्या तक्रारी वाढत आहेत.कांदा व्यापाºयांचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी, तसेच साठेबाजीच्या संशयावरून प्राप्तिकर खात्याने लासलगावच्या ४ तर येवल्याच्या एका बड्या कांदा व्यापाºयांवर धाडी टाकल्या. कार्यालये व कांदा साठवणुकीच्या खळ्यांवर पडलेल्या छाप्यांनी व्यापाºयांचे धाबे दणाणले. त्या निषेधार्थ व्यापाºयांनी लिलाव बंदचे अस्त्र उपसले आहे. प्राप्तिकरच्या अधिकाºयांनी कांदा व्यापाºयांचे मागील पाच वर्षांपूर्वीच्या व्यवहाराच्या तपशीलाची कागदपत्रे, तसेच कांद्याची असलेली साठवणूक तपासली.केंद्र सरकार हेतुपुरस्सर व्यापाºयांना लक्ष्य करीत आहे, कांदा व्यापाºयांवर अशा धाडी पडत असतील, तर कांदा कसा खरेदी करायचा आणि तो साठवायचा कसा व कोठे, असा प्रश्न व्यापारी उपस्थित करत आहेत.>साठवणुकीवर नियंत्रणासाठी पथके?कांद्याचे वाढलेले भाव, अतिवृष्टीने झालेले नुकसान, नवीन कांदा येण्यास होणारा विलंब यामुळे निर्माण होणारी तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात कांद्याचा साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे नफाखोरीच्या उद्देशाने निर्बंध असतानाही व्यापाºयांकडून अतिरिक्त साठा केला जातो आहे की काय, याची पडताळणी करण्यासाठी ही पथके आल्याचे समजते. देशांतर्गत कांद्याच्या दराला लगाम घालण्यासाठी आता कांदा साठवणुकीवरही नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांकडून कांद्याची आवक, विक्री आणि शिल्लक साठा याबाबतचा दैनंदिन अहवाल मागवून, साठवणुकीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यांतील कांदा व्यापाऱ्यांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 6:25 AM