नाशिक : सारडा सर्कल येथे राज्य परिवहन महामंडळाची धावती बस भर रस्त्यात अडवून चालकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपीला एक वर्षाचा कारावास आणि साडेपाच हजार रु पये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नऊ वर्षांपूर्वी घडला होता.वेणाराम पुणाराम चौधरी (रा. सिद्धिविनायक पार्क, गणेशबाबानगर, अशोकामार्ग) याने बसचालक वाळिबा नामदेव आव्हाड यांच्या बसचा स्कूटरने (एमएच१५ सीई ३६२२) पाठलाग करत सारडासर्कल येथे २१ आॅगस्ट २०१० रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची बस अडविली. सारडा सर्कलवर आरोपी चौधरी याने त्याची स्कुटर बसपुढे उभी करून रोखली. कुरापत काढून बसचालक आव्हाड यांना शिवीगाळ करत बसमधून खाली ओढून बेदम मारहाण केली होती. यावेळी त्यांच्या अंगावरील सरकारी खाकी गणवेशदेखील फाटला होता. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास हवालदार बी. एस. जाधव यांनी करत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश एस. बी. नाईक-निंबाळकर यांच्या न्यायालयात चालले.सरकारी पक्षातर्फे अॅड. अपर्णा पाटील यांनी कामकाज पाहताना सहा साक्षीदार तपासले होते. यातील तीन साक्षीदारांनी फितुरी केली होती. तरीही परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी चौधरी यास १ वर्षे साध्या कारवासाची आणि ५ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागू शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.
बसचालकास मारहाण करणाऱ्यास कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:10 AM