नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने भविष्याची वाटचाल करताना सामाजिक गरजा लक्षात घेऊन पुढील वाटचाल करण्यासाठी आवश्यक नियोजन होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करतानाच विद्यापीठाचा बृहत् आराखडा तयार करताना दूरगामी विचार करून उत्कृष्ट शिक्षण व आरोग्य सेवेसाठी गुणात्मक दर्जा वाढविण्याची आवश्यक असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. श्रीकांत देशमुख यांनी केले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बृहत् आराखडा अद्ययावत करण्यासंदर्भात उत्तर महाराष्ट्र विभागाच्या ऑनलाइन बैठकीत ते सोमवारी (दि. १४) बोलत होते. शैक्षणिक आणि सामाजिक गरजा लक्षात घेऊन बृहत् आराखड्यात योग्य बदल करताना आरोग्य सेवा मिळण्यासाठी दुर्गम भागात महाविद्यालय सुरू करण्यासाठी अधिक प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी मांडली. या बैठकीस विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, डॉ. अभय पाटकर, डॉ. कविता पोळ, डॉ. ज्योती ठाकूर, डॉ. सुदीप काळे, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. अरुण दोडामणी, डॉ. महोम्मद हुसेन, डॉ. नंदकुमार सावंत, डॉ. संजय चित्ते, डॉ. सायली हड्डे, डॉ. स्वाती पुस्तके आदी उपस्थित होते. दरम्यान, बृहत् आराखड्यासंदर्भात बुधवारी (दि. १६) मराठवाडा व गुरुवारी (दि. १७) विदर्भ विभागाकरिता ऑनलाइन बैठक होणार आहे.
इन्फो-
कुशल मनुष्यबळासाठी सर्वसमावेशक प्रयत्न आवश्यक
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी नियमित विविध उपक्रम राबविले जात असले तरी आरोग्य शिक्षण क्षेत्रात पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी प्रशिक्षकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे असून, आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे यांनी व्यक्त केले.