सिन्नर : सुधारित अत्याधुनिक कांदा साठवण गृह शेतकऱ्यांनी उभारावे, असे आवाहन राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील राष्ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास संस्थेच्या विभागीय संशोधन केंद्रास महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. या वेळेस त्यांनी सुधारित अत्याधुनिक कांदा साठवणगृहाची पाहणी केली. कांदा हे पीक नाशिक जिल्ह्याचा मानबिंदू आणि प्रमुख नगदी पीक असून, कांदा हे शेतकऱ्यांचे आवडते आणि पैसा मिळवून देणारे पीक आहे. या पिकाची कांदा चाळीत साठवण केल्यानंतर ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वजन व सडकुजीमुळे घट येत असते. हे प्रमाण कमी करण्यासाठी सिन्नर येथील कुंदेवाडीच्या राष्ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रक्षेत्रावर सुधारित अत्याधुनिक पद्धतीचे सच्छिद्र खोलीचे, बाहेर हवा फेकणारा पंखा आणि जाळी याच्या मदतीने सुधारित अत्याधुनिक कांदा साठवणगृहाची निर्मिती करण्यात आली आहे.
सदर सुधारित अत्याधुनिक कांदा साठवणगृहामधील कांदा सहा महिन्यांपर्यंत चांगल्या स्थितीत राहत असून, फक्त १४ टक्क्यांपर्यंतच वजनात घट होते, तसेच कांद्याची सड होत नाही, कांद्याला कोंब फुटत नाही, कांद्याचा रंग जसाच्या तसाच राहत असल्याची माहिती राष्ट्रीय बागबानी संशोधन आणि विकास संस्थेच्या कुंदेवाडी प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी बी.पी. रायते यांनी दिली.
सदर साठवणगृहाचा प्रतिकिलो किती खर्च येतो, असा प्रश्न सचिवांनी विचारला असता प्रतिकिलो ४८ पैसे वीज खर्च सहा महिन्यांच्या कालावधीकरिता येतो, तसेच सदर सुधारित अत्याधुनिक कांदा साठवणगृह उभारणीकरिता सुमारे ३ लाख खर्च येत असल्याचे उत्तर सहसंचालक एच.पी. शर्मा यांनी दिले. सदर सुधारित अत्याधुनिक कांदा साठवणगृह संचालनासाठी ४८ पैसे प्रतिकिलो खर्च येत असल्याने हे कांदा साठवणगृह शेतकऱ्यासाठी आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असून, याच्या उभारणीकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शासकीय अनुदान देण्यासाठी विचार करणार असल्याची माहिती कृषी सचिव एकनाथ डवले यांनी यावेळी दिली.
यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले यांचे स्वागत राष्ट्रीय बागबानी संशोधन आणि विकास संस्थेचे सहसंचालक एच.पी. शर्मा यांनी केले. यावेळी राष्ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास संस्थेचे उपसंचालक डॉ. सतेंद्र सिंग, सहायक संचालक डॉ. आर.सी. गुप्ता, तंत्र अधिकारी डॉ. पी. भास्कर आदींची उपस्थिती होती. यानंतर कृषी सचिव यांनी राष्ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रक्षेत्रावरील कृषी विभागाकडून अनुदानित शेततळ्याची पाहणी केली. सदर शेततळ्याची १०० टीसीएम लिटर पाणी साठवण क्षमता असून, सदर शेततळे अडीच एकर क्षेत्रात उभारले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांनी दिली. यावेळी नाशिक विभागाचे कृषी सहसंचालक संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, प्रकल्प संचालक (आत्मा) राजेंद्र निकम, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, देवरे, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) हेमंत काळे, मंडळ कृषी अधिकारी महेश वेठेकर, संजय पाटील, कृषी पर्यवेक्षक राजेंद्र बिन्नर, रणजित आंधळे, कृषी सहायक संध्या दये आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळी: २५ सिन्नर डवले
कुंदेवाडी येथील राष्ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास संस्थेच्या विभागीय संशोधन केंद्रास राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी भेट दिली. त्याप्रसंगी डॉ. सतेंद्र सिंग, डॉ. आर.सी. गुप्ता, डॉ. पी. भास्कर संजीव पडवळ, विवेक सोनवणे, राजेंद्र निकम, गोकुळ वाघ, हेमंत काळे, अण्णासाहेब गागरे आदी.
250721\25nsk_39_25072021_13.jpg
कुंदेवाडी येथील राष्ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास संस्थेच्या विभागीय संशोधन केंद्रास राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी भेट दिली. त्याप्रसंगी डॉ. सतेंद्र सिंग, डॉ. आर. सी. गुप्ता, डॉ. पी. भास्कर संजीव पडवळ, विवेक सोनवणे, राजेंद्र निकम, गोकुळ वाघ, हेमंत काळे, अण्णासाहेब गागरे आदि.