नाशिक : महापालिकेने मोबाइल अॅपमार्फत उपलब्ध करून दिलेल्या तक्रार निवारण प्रणालीतील त्रुटी दूर करतानाच त्यात आणखी सुधारणा केली असून, तक्रार निकाली निघण्याची स्थिती आॅनलाइन पाहता येणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून नागरिकांना अद्ययावत तक्रार निवारण प्रणालीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे. महापालिकेचा स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष आहे. याशिवाय, डॉ. प्रवीण गेडाम हे आयुक्त असताना त्यांनी ‘स्मार्ट नाशिक’ या मोबाइल अॅपमार्फत नागरिकांना तक्रारी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. परंतु, या तक्रार निवारण प्रणालीतील काही त्रुटी समोर आल्या. एखाद्या नागरिकाने तक्रार केल्यानंतर ती निकाली काढली किंवा नाही तसेच तिची स्थिती याचा उलगडा होत नव्हता. मात्र, आता सुधारित प्रणालीत तक्रारदार नागरिकाला गुगल मॅपवर ठिकाणासह तक्रारीची स्थिती कळणार आहे. याशिवाय, महापालिकेच्या प्रत्येक विभागनिहाय तक्रारींची संख्याही कळणार आहे. तसेच कोणत्या तक्रारीचे किती दिवसांत निराकरण झाले याचीही माहिती समजणार आहे. ठरवून दिलेल्या कालावधीत तक्रारीचे निवारण झाले नाही तर ती पुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग होणार आहे. शेवटी आयुक्तांकडे सदर तक्रार जाणार असून, त्यावर अंतिम कारवाई केली जाणार आहे. तक्रारीच्या स्थितीसंबंधी नागरिकाला एसएमएसही जाणार आहे. तसेच एखादी तक्रार निकाली काढल्यानंतर त्यासंबंधीचे छायाचित्रही संबंधित विभागाला अपलोड करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
तक्रार निवारण प्रणालीत सुधारणा
By admin | Published: October 26, 2016 11:35 PM