योगेश सगर, नाशिक : साहेब... आम्ही कसं जगायचं..., कांदा आणि टोमॅटोला भाव नाही, सलग पाच वर्षांपासून बाोत हाती काही येत नाही, घरातून पावडरीचे पैसे द्यायचे, कधी अवकाळी, तर कधी गारपीट, कर्जाचा डोंगर वाढतोच आहे, काय करू, शेवटी बागच तोडून टाकतो, असे उद्विग्न होत निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्याने माजी मंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच उभ्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली. यावेळी पाटीलही क्षणभर स्तब्ध होत आचंबित झाले.राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी (दि.१) मौजे सुकेणेे, पिंपळस येथे गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. मौजे सुकेणे येथे पाहणी करीत असताना उद्विग्न झालेल्या संदेश मोगल व भारत राजाराम मोगल या शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोरच उभ्या द्राक्ष बागेला कुऱ्हाड लावत बाग तोडायला सुरुवात केली. पाच ते सहा वर्षांपासून सातत्याने तोटा येत असून आज ना उद्या दोन पैसे येतील या अपेक्षेने द्राक्ष बाग जगवत आलो; मात्र आता निसर्गही साथ देत नाही, कर्ज काही कमी होत नाही, सरकारही काही करीत नाही, या उद्विग्न भावनेतून या शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली. यावेळी जयंत पाटील यांनी शेतकऱ्याशी संवाद साधत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.
'कांदा, टोमॅटाे यात काहीही झाले नाही, बागेवर अपेक्षा होती; मात्र गारपिटीने १०० टक्के नुकसान झाले, त्यामुळं आता भांडवल कुठून आणायचे, अखेर २ एकर द्राक्ष बाग तोडून टाकली.'- संदेश मोगल, गारपीटग्रस्त शेतकरी, मौजे सुकेणे