नरेंद्र दंडगव्हाळ
सिडको : अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक अशोक नजण यांनी मंगळवारी (दि.२०) सकाळी पोलीस स्टेशनमध्ये स्वतःच्या सर्विस रिव्हॉल्व्हर ने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने नाशिक परिसरात खळबळ उडाली आहे. सर्वच वरीष्ठ पोलीस आधिकारी अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. नजन यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप पुढे आलेले नाही.
अशोक नजन हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे अंबड पोलीस स्टेशन मध्ये ड्युटीवर हजर झाल्यानंतर ते त्यांच्या केबिनमध्ये बसलेले होते. दरम्यान यानंतर पोलीस ठाण्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी सुरू करण्यात आली होती. सर्व कर्मचारी हे हजर झाल्यानंतर त्यांना बोलवण्यासाठी हजेरी मास्तर शरद झोले हे त्यांच्या केबिनमध्ये गेले असता नजन हे रक्ताच्या थोरोळ्यात खुर्चीवर पडलेले त्यांना दिसून आले. त्यानंतर सर्वत् पोलिसांची धावाधाव सुरू झाली. त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडुन घेतल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत ,सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर हे पोलीस ठाण्यात दाखल झाले. दरम्यान यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव हेदेखील पोलीस ठाण्यात पोहचले आहे.