धनंजय रिसोडकर
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकटेमध्ये जिल्हा रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स तसेच काही अन्य कर्मचारी सहभागी असल्याच्या पार्श्वभूमीवर चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. चौकशीचा अहवाल आराेग्य विभागाच्या आयुक्तांकडे पाठविण्याचे आदेश आरोग्य उपसंचालकांना देण्यात आले असून अहवालातील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांनी सांगितले.
पोलीस कर्मचाऱ्यांनी २०१९ ते २०२२ या कालावधीत बदलीसाठी सादर केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी सुरु केल्यानंतर त्यातून अनेक गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळेच या घोटाळ्यात वरिष्ठ महिला लिपिक आणि लिफ्टमन कांतीलाल गांगुर्डे याला अटक करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण पासणीत सिव्हिलचे तत्कालीन सिव्हिल सर्जन आणि अतिरिक्त शल्य चिकित्सकांच्या सह्यांचे बोगस प्रमाणपत्र मिळून आले आहे.बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र ही एक मोठी साखळी असण्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
एकूण तब्बल २४ बनावट प्रमाणपत्र आढळून आली असल्याने अजून काही डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची ही शक्यता आहे. जी शस्त्रक्रिया कधी झालीच नाही, अशी शस्त्रक्रिया झाल्याचे प्रमाणपत्र त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. तसेच काहींनी तर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्याचे उघड झाले असल्याने त्या फायली देखील तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे संबंधित खासगी रुग्णालयांची ही चौकशी होण्याची शक्यता आहे.