विंचूर ( नाशिक) : जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारल्याने आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव बंद होते. व्यापारी व संचालक मंडळाच्य़ा बैठकी नंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजारात आज (गुरुवारी) सकाळच्या सत्रात कांदा लिलाव झाले. सकाळच्या सत्रात पाचशे तीस नगांची आवक झाली. कमीत कमी एक हजार, कमाल चोविसशे एक तर सरासरी एकविसशे पंचाहत्तर रुपये भाव मिळाला.
अनंत चतुर्दशी असल्याने दुपारच्या सत्रातले लिलाव बंद ठेवण्यात आले. शुक्रवारपासून नियमितपणे दोन्ही सत्रातले लिलाव सुरु राहणार असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजारसमितीत सकाळी साडेआठच्या सुमारास लिलावाला प्रारंभ होताच, शेतकऱ्यांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले. कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह दिसून आला. गेल्या आठवड्यापासून कांदा व्यापा-यांच्या संपामुळे बाजार समित्या ठप्प झाल्या आहेत. कधीही बंद न राहणारे आणि इतर बाजार समित्यांनी अनुकरण केलेल्या विंचूर उपबाजार समितीच्या व्यापा-यांनी जिल्ह्यात आदर्श घालुन दिला आहे. विंचूर उपबाजारात सकाळपासूनच शेतक-यांनी टॅक्टर, पिकअपमध्ये आपला कांदा लिलावासाठी आणला. आठ दिवसांपासून येथे कांदा लिलाव बंद असले तरी विंचूर उपबाजारात धान्याचे लिलाव सुरळीत होते. कांदा व्यापारी व संचालकांची बैठक झाली. शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून विंचूर उपबाजार आवारात कांदा लिलाव आजपासून सुरू करण्यात आला आहे.- पंढरीनाथ थोरे, माजी सभापती तथा विद्यमान संचालक, लासलगाव बाजार समिती