अझहर शेख , नाशिक : मागीलवर्षी सप्टेंबर महिन्यात नाशिकरोडपोलिसांनी एक लहरा-सामनगाव रोडवरून एका ड्रग्ज पेडलरला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून १२.५ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली होती. आता पुन्हा अशाचप्रकारची कारवाई गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाकडून करण्यात आली आहे. आश्विनी कॉलनीत राहणाऱ्या एका पेडलरला सामनगावरोडवर एका कॉलेजजवळ एमडी (मेफेड्रॉन) पावडर विक्रीसाठी ग्राहक शोधत असताना रंगेहात पकडण्यास यश आले.
सामनगाव रोडवरून ७ सप्टेंबर २०२३ साली नाशिकराेड पोलिसांनी गणेश संजय शर्मा या ड्रग्ज पेडलरला ताब्यात घेतले होते. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याचा ताबा गुन्हे शाखा युनिट-१कडे देण्यात आला होता. युनिट-१ व अंमली पदार्थविरोधी व गुंडाविरोधी पथकाने याप्रकरणी सखोल तपास करत थेट भोपाळ अन् केरळपर्यंत एमडी विक्रीचे धागेदोरे शोधून काढले होते. १७संशयितांची टोळी निष्पन्न करून १५जणांना बेड्या ठोकल्या होत्या. नाशिकमध्ये ड्रग्जविक्री करणारा मास्टरमाइन्ड सनी पगारे, सुमीत पगारे व त्याचा डिस्ट्रिब्युटर अक्षय नाईकवाडे हा सराईत गुन्हेगारालाही बेड्या ठाेकण्यास पोलिसांना यश आले होते. यानंतर पुन्हा नाशिकमध्ये एमडी ड्रग्जविक्रीचा सामनगावरोडवर ‘यु-टर्न’ बघावयास मिळाला.
गुन्हे शाखेच्या युनिट-२चे अंमलदार विशाल कुंवर, समाधान वाजे यांनी एमडी ड्रग्ज विक्रीबाबतची गोपनीय माहिती सोमवारी (दि.१८) मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना कळविले. त्यांनी पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली साध्या वेशात पथक सज्ज करून सापळा लावण्यात आला. यावेळी संशयित आरोपी पेडलर किरण चंदु चव्हाण (२३,रा.अश्विनी कॉलनी, सामनगावरोड) हा याठिकाणी संशयास्पदरित्या वावरत असताना दिसला. पथकाने त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे मिनी वजनकाट्यासह ५८ हजार १७० रूपये किंमतीची १९.३९ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर आढळून आली. त्याच्याविरूद्ध अंमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.