गणेश शेवरे
पिंपळगाव बसवन्त (नाशिक)- जिल्ह्यात कांदाप्रशनी शेतकरी आक्रमक झाले आहेत, दिवसेंदिवस घसरणाऱ्या दरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज केंदीय मंत्र्याना घेराव घालत जाब विचारला.
नाफेडमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी भाव पाडण्यासाठीच असून सरकार याप्रश्नी चालढकल करीत असल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनेने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना घेराव घातला. निर्यात वाढली म्हणतात मग शेतमालास भाव का नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
रविवारी (दि. ५) निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी मंत्री भारती पवार आल्या होत्या. त्यावेळी कांदा दरावरून त्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला. शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोराडे यांनी शेतमालास भाव नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. शेतकरी संघटनेने लेखी द्यावे आम्ही नाफेडची खरेदी बंद करू, असे यावेळी पवार म्हणाल्या. जिल्ह्यात सध्या चांदवड, देवळा, सटाणा येथे आंदोलने झाली आहेत.