नाशिक : ‘राजा का बेटा राजा नही होता, जो काम करेगा वो राजा बनेगा’ असेच धोरण आमच्या पक्षात असून जो काम करेल तोच पदाधिकारी, कार्यकर्ता मोठा होतो, आमच्याकडे कोणीही मालक नाही असे सांगत उलट उध्दव सेनेत सवंगड्यांनाच घरगडी बनविले जात असल्याचा आरोप करत त्यांच्या या वागणुकीला कंटाळूनच अनेक नेते पक्षाबाहेर पडल्याचा घणाघाती प्रहार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. नाशिक येथे बुधवारी (दि.८)आयोजित शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री बाेलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, उपनेते अजय बोरस्ते, आमदार सुहास कांदे, उपनेते विजय करंजकर, उमेदवार हेमंत गोडसे आदी उपस्थित होते.
यावेळी शिंदे म्हणाले, उद्वव ठाकरे यांच्या पक्षपाती धोरणाला कंटाळूनच छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे व सर्वात शेवटी मी खासदार, आमदारांना घेऊन बाहेर पडलो. आम्हाला एवढा टोकाचा निर्णय का घ्यावा लागतोय याचाही विचार व्हायला हवा. शिवसेना-भाजप ही नैसर्गिक युती होती, परंतु सत्तेच्या मोहापायी ती तुटली. बाळासाहेब ठाकरे यांच्याच हाती रिमोट कंट्रोल होता, ते किंग मेकर होते. त्यांच्यापुढे मुख्यमंत्रीपद हे नगण्य होते. मात्र उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदासाठी सुप्त इच्छा होती. केवळ फोटोगाफी करून, फेसबूक लाईव्ह करून व घरात बसून सरकार चालवता येत नाही असाही टोलाही मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर काँग्रेसला दूर ठेवले असते, उलट आता उद्धव ठाकरे यांनी त्यांना जवळ केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले असून एका खूर्चीमुळे शिवसेना अडचणीत आली आहे.
राऊतांना राज्यसभेवर पाठवल्याचा पश्चातापराज्यसभेच्या निवडणुकीत माझा अपमान केला. त्याचवेळी इतर सहकारी संजय राऊत यांच्या विरोधात होते. मात्र आम्ही त्यांना मत देऊन राज्यसभेवर पाठवले. त्याचा पश्चाताप आता होत असून पुन्हा संधी मिळेलच असा इशारा देत राऊत सरपंचही निवडून येऊ शकत नाही अशी जोरदार टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. ठाकरेंवर हल्लाबोलपंचवीस राज्यातले लोक माझ्यासोबत असून राजस्थानातील चार अपक्ष आमदारही माझ्या सोबत आहे.नुसतं गद्दार व खोके म्हणून चालत नाही. उद्या तुम्ही कोर्टाला व मतदारांना गद्दार म्हणायला कमी करणार नाही,अशी टीकाही त्यांनी ठाकरेंवर केली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीतही खंजीर खुपसला, असा आरोप शिंदे यांनी केला.