गणेश घाटकर, लोकमत न्यूज नेटवर्क इगतपुरी (नाशिक) : इगतपुरीसारख्या आदिवासी अतिदुर्गम तालुक्यात शासन यंत्रणेच्या उदासीन कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. प्रसूतिवेदना सहन करणाऱ्या महिलेच्या मृत्यूनंतर झोळी करून मृतदेह तीन किलोमीटरचा प्रवास करत घरी न्यावा लागल्याची धक्कादायक घटना घडली.
जुनवणेवाडी येथील वनिता भाऊ भगत या महिलेला प्रसूतिवेदना सुरू झाल्याने गावकऱ्यांनी मध्यरात्री तीनच्या सुमारास दवाखान्यात पोहोचवले; परंतु, तिचा आणि पोटातील बाळाचाही दुर्दैवी मृत्यू झाला. मृतदेह घरी नेण्यासाठी सुविधांअभावी झोळी करावी लागली. मंगळवारी दुपारी मृतदेह झोळीतून घरी नेण्यात आला.
रस्त्याची मागणी
जुनवणेवाडीसारख्या अनेक गावात रस्ताच नाही. करोडो रुपयांच्या विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या शासनाच्या दृष्टीने ही लाजिरवाणी घटना असून या गावात तातडीने रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सीताराम गावंडा यांनी केली आहे.
रस्ता नव्हे चिखल
तळोघ ग्रामपंचायत हद्दीत जुनवणेवाडी ही आदिवासी वस्ती असून मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी गावकऱ्यांना सुमारे तीन किलोमीटरच्या अतिशय कच्च्या रस्त्याने यावे लागते. पावसामुळे रस्ता सध्या चिखलमय झाला आहे.