सिडको: औषधपुरवठा करणारी कथित फर्म स्थापन करून त्याद्वारे मेंदूविकारावरील औषध तयार करून देण्याच्या बहाण्याने सिडकोतील एका डॉक्टरची तब्बल ३६ लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ११ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, कुणाचेही पूर्ण नाव आणि पत्ते देखील माहीत नसल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.
सिडकोतील शिवशक्ती चौकात डॉ. सतीश बुधाजी जगताप यांचे क्लिनिक आहे. संशयित शिवानी पाटील, सबेरे लाल, चंद्रावती सिंग, शुभम नामदेव, जयश्री शेठ, बिक्रम लिंबू, सुनील बाल्मीक, जयप्रसाद तिवारी, संजय शर्मा, बिक्रम बन्सल, अँजेल एडवर्ड यांनी राजू एंटरप्रायजेस नावाची फर्म स्थापन करून त्या माध्यमातून त्यांनी डॉ. जगताप यांच्याशी संपर्क साधला. या फर्मच्या माध्यमातून त्यांनी डॉक्टरला लागणारे विविध प्रकारच्या औषधांचा पुरवठा करून त्यांचा विश्वास संपादन केला.
डाॅ. जगताप यांना मेंदूविकारावरील औषधांची आवश्यकता होती, ही संधी साधत संशयितांना डॉक्टरांना मेंदू विकारावरची औषधे तयार करून देतो, अशी बतावणी करीत त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी त्यांच्याकडून दि. २ मे २०२१ ते २५ मे २०२२ या एक वर्षाच्या कालावधीत वेळोवेळी रक्कम घेतली. औषधांसाठी लागणारा कच्चा माल बाहेरून आणावा लागणार असल्याची बतावणी करीत यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी संशयितांनी डॉ. जगताप यांच्याकडून वेळोवेळी ३६ लाख रुपये घेतले. मात्र, मेंदूविकारावरील कच्चा माल किंवा औषध देखील दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे जगताप यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले करीत आहेत.