नाशिक : सिडको-सातपूर स्वतंत्र महापालिकेच्या मागणीवर सातपूरमध्ये झालेल्या सभेत जवळपास सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित असताना त्याच्या दुसऱ्याच दिवशी सर्वच पक्षाच्या स्थानिक प्रमुखांनी सावध पवित्रा घेत हा मुद्दा राज्य सरकारच्या अखत्यारितला असल्याचे सांगत त्यापासून अंग झटकले, तर दुसरीकडे त्यावर टीका करताना अनेकांनी असा प्रस्ताव आल्यास त्यावर कारदेशीर अभ्यास करून मगच भूमिका मांडू असे स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसांपासून शहरात विकासकामे आणि निधीचे वाटप यावरून सिडको-सातपूर स्वतंत्र महापालिका तयार करण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनीच आघाडी उघडली आहे. त्या आघाडीत विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी सहभागी आहेत. मनसेचे सभागृह नेते, पालिकेतील विरोधी पक्षनेते अशानीही या मागणीला समर्थन दिलेले असताना त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र हा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या अखत्यारितला असल्याने त्यावर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात असमर्थता दर्शविली आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या भाजपाच्या काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी नाशिकमध्येही विभाजनाची तयारी चालविली असतानाच युतीतील घटक असलेल्या शिवसेनेने स्थानिक पातळीवर अखंडतेची भूमिका सोडून जनभावनेचा आदर करणार असल्याचे म्हटल्यामुळे या मुद्द्यावरून पक्षांमध्येच संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे अनेक नेत्यांनी या मागणीला विरोध करताना अशी मागणी करणाऱ्यांपैकी अनेक लोकप्रतिनिधींनी पालिकेत महत्त्वाची पदे भूषविली आहेत. मग त्यावेळी त्यांना सिडको-सातपूरकडे दुर्लक्ष होते असे का वाटले नाही असा सवाल करीत या मागणीची खिल्ली उडविली आहे, तर या मागणीला समर्थन करीत काही लोकप्रतिनिधींनी परिसराच्या विकासासाठी ही मागणी मंजूर व्हायला हवी अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी पक्षाची बंधने झुगारून प्रसंगी लढा देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. या मागणीमध्ये काही स्थानिक पक्षप्रमुखांनी मात्र सावध भूमिका घेत हा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारच्या अखत्यारितला असल्याने त्यावर आपण काही बोलू शकत नाही त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया असून, त्यातूनच हा प्रश्न सोडवावा लागतो असे सांगितले. एकूणच या मुद्द्यावर सुरू असलेल्या वैचारिक युद्धाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात असमर्थता दर्शविली
By admin | Published: December 08, 2014 1:21 AM