कोव्हॅक्सिनचा पहिला डोस? खासगी रुग्णालयात घेणाऱ्या नागरिकांना आता खासगी रुग्णालयात लसीचा दुसरा डोसच उपलब्ध नसल्याने त्यापासून वंचित राहावे लागत आहे. लासलगाव ही आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ मानली जाते. शहरातील लोकसंख्येचा विचार केला तर पाहिजे त्या प्रमाणात येथील निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या लसीकरण केंद्रात जिल्हा आरोग्य विभागाकडून पुरेसा लस साठा उपलब्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केले जाते; परंतु या आठवड्यात या आरोग्य केंद्रातील लस साठा शिल्लक नसल्यामुळे नागरिकांचा हिरमोड होत आहे.
लासलगाव शहरातील मोठ्या लोकसंख्येचा विचार करून जिल्हा आरोग्य विभागाने तत्काळ येथील निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा प्रमाणात लस साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते सूरज नाईक, प्रतीक चोथानी, सूरज अब्बड,ओम चोथानी, व्यंकटेश दायमा, विशाल पालवे, मयूर बोरा, अभिजित जाधव, चिराग जोशी यांनी केली आहे.
समन्वयाचा अभाव
दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात सुरुवात केली असून, त्यास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला ैआहे. परंतु केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने राज्यासह नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच आरोग्य केंद्रांवर पुरेशा प्रमाणात लसच उपब्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांना माघारी परतावे लागत आहे.