मांडवड : लक्ष्मीनगर, ता. नांदगाव येथील सार्वजनिक विहीर पुनर्भरणाचे उद्घाटन सरपंच बापूसाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.तालुक्यात सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा पोहोचत असताना लक्ष्मीनगरही याला अपवाद नाही. साधारण जानेवारीपासूनच सार्वजनिक विहिरीने तळ गाठला होता. गावाला पाणी पुरवठा योजना चालू आहे; मात्र ते पाणी पुरेसे पडत नसल्याने सर्वसामान्य लोकांना सार्वजनिक विहीर व हातपंप हा एटीएमसारखा होता; मात्र या दोन्ही पाणी स्रोतांनी तळ गाठल्याने गावातील नागरिक व जनावरांचे एकच हाल झाले, त्यामुळे सरपंच जाधव यांनी गावासाठी तत्काळ केंद्र शासनाची ३ लाख पन्नास हजार रुपयांची योजना मंजूर करून आज या योजनेचे उद्घाटनही केले. ही योजना गावातील जी सार्वजनिक विहीर आहे तिच्या बाजूला साधारण ५० ते १०० फूट अंतरावर साधारण १० बोअरवेल करणार असून, त्याचे येणारे पाणी हे सार्वजनिक विहीर भरण्यासाठी उपयोगी पडणार आहे, यामुळे गावातील पाणी पातळी उंचवून त्याचा फायदा भविष्यात गावालाच होणार आहे़ योजनेचे उद्घाटन होत असताना नागरिकांच्या चेहऱ्यावर मात्र समाधान दिसत होते. यासाठी सरपंच जाधव, ग्रामसेवक शिंदे आणि योजनेचे ठेकेदार गायके यांचे भरभरून सहकार्य लाभले.
लक्ष्मीनगर येथील सार्वजनिक विहिरीच्या पुनर्भरणाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:17 AM