नाशिकरोड : जेलरोड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या संत अण्णा महामंदिराचा (कॅथिड्रल) मंगळवारी विधिवत पूजा करून लोकार्पण सोहळा इटलीचे पोप फ्रान्सिस यांच्या सल्लागार समितीचे सदस्य कार्डिनल ओजवर्ल्ड ग्रेशियस यांच्या हस्ते झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारताच्या विविध भागातून आलेले १५ बिशप्स, दोन आर्च बिशप व ४५० धर्मगुरू उपस्थित होते. महामंदिराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना कार्डिनल ओजवर्ल्ड ग्रेशियस म्हणाले की, देवासाठी बाह्य मंदिर बांधून झाले असून, आता प्रत्येकाने हृदयातील मंदिर बांधावे. आजच्या बदलेल्या वातावारणात बंधुभाव, अंहिसा, प्रेम या तत्त्वांची जगाला मोठी गरज आहे. समाजविरोधी तत्त्वे हिंसा पेरत आहेत. आपण येशूच्या शिकवणीप्रमाणे प्रेमाची पेरणी करत जाऊ या. प्रेम करणे हीच ईश्वराची भक्ती आहे, असे ग्रेशियस यांनी सांगितले. यावेळी नाशिक धर्मप्रांताचे बिशप लुर्डस डॅनियल यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी महामंदिराचे वास्तुविशारद जॉन वर्गीस, बांधकाम व्यावसायिक गिरीश चौव्हान यांनी ग्रेशियस यांच्याकडे महामंदिराच्या चाव्या सुपूर्द केल्या त्यानंतर वेदी व भिंतींना तेलाचा अभिषेक, धार्मिक विधी झाल्यानंतर ग्रेशियस यांच्या हस्ते फीत कापून महामंदिराचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी सर्व संतांची लितानिया गाऊन आशीर्वाद मागण्यात आले. महामंदिरासाठी योगदान देणाºया कामगारांपासून वास्तुविशारदापर्यंत सर्वांचा ग्रेशियस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बिशप सल्लागार समितीचे सदस्य फादर रॉबर्ट पेन, विकार जनरल, फादर रवि त्रिभुवन, फादर पीटर डिसूझा आदींसह सुमारे ८ ते १० हजार ख्रिस्ती समाजबांधव उपस्थित होते.१९८७ ची मूळ स्थापना १९८७ मध्ये स्थापन झालेल्या नाशिक धर्मप्रांताला आता नवीन कॅथिड्रल लाभले असून, महाराष्ट्रातील सर्वात मोठे कॅथिड्रल आहे. या महामंदिरात चार हजार भाविक एकाचवेळी बसू शकतात. मध्ययुगीन युरोपातील निओ गॉथिक शैलीचे स्थापत्यशास्त्र वापरून महामंदिराची उभारणी करण्यात आली आहे. महामंदिरात कॅथिड्रल पास्टरल सेंटर, कॅटेकॅटिकल सेंटर, आराधना केंद्र आणि धर्मगुरू निवासस्थानाची सुविधा आहे.
उद्घाटन : पोप फ्रान्सिस सल्लागार समितीचे कार्डिनल ओजवर्ल्ड ग्रेशियस यांची उपस्थिती संत अण्णा महामंदिराचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:27 AM