नाशिक : सार्वजनिक वाचनालयाचे वस्तुसंग्रहालय म्हणजे नाशिकच्या शिरपेचातील मानाचा तुरा. त्यातील वस्तू अतिशय दुर्मिळ असून, या वस्तूंच्या जतनाचे कार्य सावाना अतिशय सुंदररीतीने करीत आहे, हे अतिशय भूषणावह आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात सावानाचा दबदबा आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या प. सा. नाट्यगृह व परिसर, प्रवेशद्वार, मु. शं. औरंगाबादकर सभागृह आणि वस्तुसंग्रहालय या ठिकाणी २ लाख ८० हजार रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते झाले. सीसीटीव्ही यंत्रणेचे महत्त्व विशद करताना ते पुढे म्हणाले की, दिवसेंदिवस चोऱ्या, महिलांना छेडणे,अपघात, चेनस्नॅचिंग यांसारख्या घटना सातत्याने घडत आहेत. सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी या यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे पोलिसांना मदत होत आहे. गुन्हेगारापर्यंत लवकर पोहोचता येते. सावानाने ही यंत्रणा बसवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. याप्रसंगी उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, डॉ. धर्माजी बोडके, अॅड. अभिजित बगदे, शंकरराव बर्वे, बी. जी. वाघ, जयप्रकाश जातेगावकर, वसंत खैरनार, माजी अध्यक्ष अण्णासाहेब झेंडे आदी उपस्थित होते. स्वागत प्राचार्य विलास औरंगाबादकर यांनी केले. सावानाच्या कार्याची माहिती श्रीकांत बेणी यांनी दिली तर अॅड. भानुदास शौचे यांनी आभार प्रदर्शन केले.
सावानामध्ये सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:33 AM