सप्तशृंगगड : येथील जिल्हा परिषदेच्या ई-लर्निंग डिजिटल शाळेचे उद्घाटन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ६) सकाळी करण्यात आले. यावेळी उपसरपंच राजेश गवळी याच्या हस्ते भुसे यांचा शाल, श्रीफळ व देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. सप्तशृंगगगड निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहांतोडे, तहसीलदार कैलास चावडे, ट्रस्टचे विश्वस्त रावसाहेब शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गिरीश गवळी, गणेश बर्डे यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सप्तशृंगगडावर जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत दगडात बांधकाम केलेली होती. वर्गखोल्यांच्या भिंती तुटल्या होत्या. पत्रे फुटले होते. पावसाळ्यात वर्ग गळायचे, खिडक्या तुटलेल्या अशा अवस्थेत येथील विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत होते. त्यामुळे आताच्या डिजिटल शाळेमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेता येणार आहे. कै. कारभारी गवळी यांच्या स्मरणार्थ येथील शालेय विद्यार्थ्यांना राजेश गवळी यांच्यातर्फ सर्व विद्यार्थ्यांना दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेच्या आवारात बसण्यासाठी प्लॅस्टिकचे बाकडे देण्यात आले. आता येथील विद्यार्थ्यांना ई-लर्निंग डिजिटलद्वारे शिक्षण मिळणार असून, पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. कार्यक्रमास ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, शालेय समितीचे अध्यक्ष तसेच उपसरपंच राजेश गवळी, ग्रामपंचायत सदस्य गिरीश गवळी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, ट्रस्टचे कर्मचारी मुरली गायकवाड, दिलीप पवार, प्रकाश जोशी, ग्रामपंचायत सदस्य जगन बर्डे, बांधकाम ठेकेदार शांताराम गवळी, ग्रामसेवक रतिलाल जाधव, सप्तशृंगगड शिवसेना शहरप्रमुख महेश पाटील, मुख्याध्यापक अशोक बच्छाव, शिक्षकवृंद, ग्रामस्थ विवेक बेनके, योगेश कदम, ईश्वर कदम व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्तशृंगगडावरील नैसर्गिक वातावरणात शाळेची दोन मजली इमारत बांधण्यात आली असून, त्यात पहिली ते चोैथी अशा ई-लर्निंग स्कूल वर्गाच्या चार वर्गखोल्या आहेत. या चारही वर्गांमध्ये एलईडी टीव्ही लावण्यात आले आहेत. शाळेच्या भिंतींवर रंगेबीरंगी चित्र काढण्यात आले असून, सर्वच भिंतींवर इंग्रजीत एबीसीडी, पाडे, इंग्लिश शब्द, कार्टून काढण्यात आली आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या १८१ असून, विद्यार्थिसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांचे मन रमावे व जिव्हाळा निर्माण व्हावा यासाठी व खेळण्यासाठी मोठे पटांगण असून, घसरगुंडी, पाळणे आदी साहित्य बसविण्यात आले आहे.
सप्तशृंगगडावर डिजिटल शाळेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:47 AM