नाशिक : सामान्य मुलांपेक्षा दिव्यांग मुलांचे जीवन कठीण असले तरी त्यांचे जगणे इतरांनाही स्फूर्ती देणारे असल्याचे ही मुले त्यांच्या कलाकृतीतून दाखवून देत असल्याचे प्रतिपादन शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या द्वितीय महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धा २०१९-२० चे गुरुवारी (दि.१३) दिमाखात उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्रा. रवींद्र कदम, श्यामराव लोंढे, राजेश जाधव, दिना वाघ, हेमंत गव्हाणे आदी उपस्थित होते. डॉ. वैशाली झनकर म्हणाल्या, दिव्यांग बालनाट्य स्पर्धेतून अशा मुलांना कलाविश्वात मुक्त संचाराची संधी असून, येणाऱ्या दिवसांमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनाही या स्पर्धांमध्ये सहभागी होता यावे यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पाच नाटकांचे सादरीकरण झाले. यात टाकळघाट येथील संत विक्तुबाबा मतिमंद मुला-मुलींच्या निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी हक्कांसाठी लढण्यापेक्षा स्वकर्तव्याशी एकनिष्ठ राहून सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून के लेले कर्तव्य निष्फळ ठरत नाही. याची शिकवण देणाºया ‘धोंडफळ’ नाटकाने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. त्यासोबतच पहिल्या दिवशी प्रबोधिनी विद्यामंदिर नाशिकच्या विद्यार्थ्यांनी मनीषा नलगे लिखित कांचन इप्पर दिग्दर्शित काव काव नाटकाचे सादरीकरण केले. तर पडसाद अपंग व पुनर्वसन केंद्र नाशिक यांच्या पल्लवी पटवर्धन लिखित व दिग्दर्शित होम अरेस्ट, मुंबईच्या रोटरी संस्कारधाम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डॉ. विजया वाड लिखित व भरत मोरे दिग्दर्शित मंकू माकडे व नाशिकच्या पुनर्वास मतिमंद मुलांच्या शाळेने शुभांगी पोवार लिखित व दिग्दर्शित हरवत चाललंय बालपण हे नाटक सादर करताना दमदार अभिनयातून प्रेक्षक व परीक्षकांनाही प्रभावित केले. विशेष म्हणजे बहुतांश संस्थांनी सामाजिक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणाºया विषयांवर भर टाकण्याचा प्रयत्न करीत या स्पर्धेतून सामाजिक समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या स्पर्धांचे परीक्षण नयना डोळस, वृषाली घारपुरे, निलांबरी खामकर करणार आहेत.
दिव्यांग बालनाट्य स्पर्धांचे दिमाखात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:24 PM
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या द्वितीय महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धा २०१९-२० चे गुरुवारी (दि.१३) दिमाखात उद्घाटन झाले.
ठळक मुद्देदिव्यांग बालकलाकारांचा कलाविष्कार दि्वतीय दिव्यांग बालनाट्य स्पर्धेस सुरुवात