नाशिक : चित्रकार अनिल माळी यांनी रेखाटलेल्या विविध प्रकारच्या निसर्गचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रकांत धामणे आणि दीपक देवरे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. गंगापूर रोडवरील हार्मनी आर्ट गॅलरीत प्रारंभ झालेले हे प्रदर्शन नागरिकांसाठी १२ आॅगस्टपर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे.प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर बोलताना धामणे यांनी माळी यांच्या चित्रशैलीचा प्रवास मूर्ततेकडून अमूर्ततेकडे झाला असल्याचे सांगितले. त्या अमूर्त चित्रांमध्येदेखील रंगांचा अप्रतिम ताळमेळ साधला गेल्याने ती अत्यंत मनमोहक दिसतात. नाशिकच्या या चित्रकाराचा प्रवास असाच बहरत राहो, अशा शुभेच्छादेखील धामणे यांनी दिल्या. हे चित्रप्रदर्शन दररोज सायंकाळी ५ ते ९ या वेळेत नागरिकांसाठी खुले असून, नागरिकांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन माळी यांनी केले. याप्रसंगी विवेक गरूड, दिनकर जानमाळी, अनिल अभंगे, केशव कासार, विनोद राठोड आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
माळी यांच्या निसर्गचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:46 AM