मालेगाव : रस्ते शरीराची तर महामार्ग समाजाची नाडी आहे. भर उन्हात आणि पावसात वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत समाजसेवा करीत असतात. वाहतूक पोलिसांविषयी तक्रारी आल्यास त्या खपवून घेणार नाही, असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मंगळवारी (दि. २४) केले. मालेगाव शहर वाहतूक शाखेच्या वतीने २९ व्या राष्टय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते सतीश कलंत्री, हरीश मारू, केवळ हिरे आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक पोद्दार म्हणाले, मालेगावी शहर वाहतूक पोलिसांची संख्या ४२ वरून २५ वर आली आहे. वाहतूक कर्मचारी एप्रिल-मे महिन्याच्या भर उन्हात आपले कर्तव्य बजावतात. प्रदूषण आणि उन्हाशी संघर्ष करीत ते समाजसेवा करतात. वाहतूक पोलिसांविषयी तक्रारी आल्यास त्याबाबत पुरावे आढळल्यास सत्यता तपासून कारवाई केली जाते. वाहतूक पोलिसांनी दुर्व्यवहार न करता पोलिसांची इज्जत राखावी, असे त्यांनी आवाहन केले. याचवेळी वाहतूक सुरक्षा पत्रिकेचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमास उपअधीक्षक गजानन राजमाने, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, गणेश गुरव, इंद्रजित विश्वकर्मा, पारधी, प्रकाश सावकार, देवा पाटील, निखिल पवार, अतुल लोढा, टॅक्सी-रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
मालेगावी रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:17 AM