नाशिकरोड : नाशिकरोड बसस्थानक व रेल्वेस्थानक परिसरात पाकीट व मोबाइल चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून, याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाकीटमार टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.नाशिकरोड बसस्थानकावर सकाळपासून रात्री ९-१० पर्यंत प्रवाशांची मोठी वर्दळ असते. आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी, कामगार व रेल्वेने येणारे बहुतांश प्रवासी नाशिकरोड बसस्थानकातील बसेसने ये-जा करतात. रेल्वे, बसस्थानक येथील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पोलीस यंत्रणा व सुरक्षा व्यवस्था अतिशय तोकडी आहे. कोणी वरिष्ठ अधिकारी येणार असेल तेव्हाच ‘खाकी’ची उपस्थिती दिसते. पाकीटमारांचा सुळसुळाटनाशिकरोड बस व रेल्वेस्थानक परिसरात पाकीटमार व मोबाइल चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. दररोज अनेक प्रवाशांना पाकीटमार आपला हिसका दाखवितात. मात्र बाहेरगावचे प्रवासी किंवा गाडी येण्याची-सुटण्याची वेळ कशाला पोलिसांशी कटकट यामुळे ९७-९८ टक्के सर्वसामान्य प्रवासी, नागरिक, महिला लुटले गेल्यानंतर तक्रार देण्यास येत नाही. त्यामुळे पोलिसांच्यादृष्टीने कागदोपत्री ‘शांती’ आहे असा दावा केला जातो. मात्र चोरीला गेलेले थोडीच पुन्हा मिळणार आहे, गुन्हा दाखल केल्यानंतर चारवेळा पोलीस बोलवतील, त्यांचे शंभर प्रश्न, पंच, जबाब, कोर्टाच्या चकरा, अशा विविध कारणांमुळे खऱ्या अर्थाने कागदोपत्री शांती असते. विशेष म्हणजे पाकीटमारांमध्ये काही महिलांचादेखील समावेश असल्याचे बोलले जाते. नाशिकरोड बसस्थानकावर असलेली पोलीस चौकी ही फक्त नावालाच आहे. चोरी, लूट झाल्याचे समजल्यानंतर संबंधित प्रवासी चौकीत गेल्यावर तेथे आजूबाजूचे रिक्षाचालक संबंधिताना मुख्य पोलीस ठाण्यात पाठवितात.माबाइल चोरट्यांचादेखील चांगलाच सुळसुळाट झाला असून, दररोज बसमधून प्रवास करताना महिलांच्या पर्सची साखळी खोलून किंवा पर्स फाडून रोकड व दागिने चोरीला जाण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांत दाखल झालेल्या पाकीट चोरी, मोबाइल चोरी, मौल्यवान दागिने, रोकड चोरीचा एकही गुन्हा उघडकीस आलेला नाही. पोलिसांना पाकीटमार-मोबाइल चोरांची माहिती किंवा खबर नाही की काहीतरी सेटिंग आहे हा मात्र संशोधनाचा (तपासाचा) विषय आहे. सिंहस्थ-कुंभमेळा अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपला असून, यामुळे नाशिकचे नाव खराब होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून पाकीटमार टोळीचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
नाशिकरोडला चोरट्यांचा सुळसुळाट
By admin | Published: May 13, 2015 11:56 PM