मालेगाव : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. येत्या मे महिन्यापर्यंत शहरातील विविध मुख्य रस्त्यांची कामे मार्गी लागतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.शनिवारी (दि. २२) शहरातील श्रीरामनगर भागात नगरविकास योजनेतून २६ लाख ६६ हजार रुपयांच्या विशेष निधीतून बांधण्यात आलेल्या वैकुंठधामचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी कृषिमंत्री भुसे बोलत होते. व्यासपीठावर उपमहापौर नीलेश आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, नगरसेवक सखाराम घोडके, राजाराम जाधव, मदन गायकवाड, नारायण शिंदे आदी उपस्थित होते.शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या मोसम नदी विकास आराखडा मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच शहर विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, त्यातून होणारी कामे आगामी काळात पूर्णत्वास येतील, असेही भुसे यांनी सांगितले. यावेळी बाजार समितीचे संचालक बंडूकाका बच्छाव, सुरेश निकम, शशिकांत निकम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वास्तुविशारद बाजीराव भामरे, अभियंता भूषण मानकर व स्मशानभूमीचे बांधकाम करणारे दत्ता मोरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमोद शुक्ला, जे.पी. बच्छाव, सर्जेराव पवार, विनोद वाघ, दिलीप अहिरे, शांताराम लाठर, रामा मिस्तरी, शशिकांत निकमआदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेश गंगावणे, संजय दुसाने यांनी केले.
श्रीरामनगर वैकुंठधामचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:10 PM