नाशिक : नव्या युगाचे नवे आव्हान पेलण्यासाठी तरुण शेतकऱ्यांना कृषिविषयक तंत्रशुद्ध ज्ञानाची शिदोरी देण्याची गरज असून, देशातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर आणि श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचे डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर गुरुवारी (दि.२३) उद्घाटन झाले, त्याप्रसंगी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रारंभी गोदावरी नदी काठावर गंगापूजन करून मालेगाव स्टॅण्ड, घारपुरे घाट, गंगापूररोडमार्गे शोभायात्रा काढून सेवेकरी डोंगरे मैदानावर दाखल झाल्यानंतर जानोरी येथील शेतकरी सुनील तिडके यांच्या हस्ते सपत्निक मातीपूजन करण्यात आले. व्यासपीठावर डॉ. सुधीर तांबे, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, गणपत गायकवाड, केव्हीएन नाईक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, अर्थतज्ज्ञ नामदेव जाधव, नगरसेवक वत्सला खैरे, स्वाती भामरे, नितीन मोरे, चंद्र्रकांत मोरे, आबासाहेब मोरे आदी उपस्थित होते.
गुरुमाउली अण्णासाहेब मोरे म्हणाले, कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयी, आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती व मार्गदर्शनासोबत कृषीतील ऋषी संस्कृतीविषयीही ज्ञानाची शिदोरी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यातून शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून शेतकरी आत्महत्या कमी करणे शक्य असल्याचे सांगितले. डॉ. सुधीर तांबे यांनी श्री स्वामी समर्थ सेवामार्गाने कृषी व अध्यात्माचे धडे सर्वसामान्य तळागाळातील घटकांपर्यंत पोहचवून आजच्या युवा, तरुण पिढीला योग्य दिशा दिल्याचे मत व्यक्त केले. विभागीय कृषी संचालक संजीव पडवळ, आत्मा केंद्राचे हेमंत काळे, कैलास शिरसाठ, प्रतिभा भदाने, मधुकर जाधव यांच्यासह शेतकरी व सेवेकरी उपस्थित होते.