नाशिक : सिडकोतील त्रिमूर्ती चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असली तरी अनेक बेशिस्त वाहनचालक या ठिकाणी थांबत नाहीत. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. या चौकात वाहतूक पोलीसही उपस्थित राहात नसल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
रेल्वे सेवेला शेतकऱ्यांची पसंती
नाशिक : ओझर येथून प्रवासी विमानाने दोन तासांत दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या शहरांमध्ये जात असले तरी या सेवेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. विमानाचे आणि रेल्वेचे भाडे यात मोठी तफावत असल्याने शेतकरी रेल्वेने माल पाठविण्यास अधिक पसंती देतात.
थेट विक्रीमुळे तरुणांना रोजगार
नाशिक : शहर परिसरालगत असलेल्या गावांमधील अनेक शेतकरी तरुणांनी शहरात थेट ग्राहकांना माल विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याला शहरातील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असून ग्राहकांनाही स्वस्त दरात चांगला भाजीपाला व इतर शेतीमाल मिळू लागल्याने ग्राहक त्याला पसंती देत आहेत.
लग्नसराईमुळे बाजारपेठेत चैतन्य
नाशिक : लग्नसराईमुळे शहरातील बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण असून यामुळे अनेकांना रोजगार मिळू लागला आहे. मागील आठ ते नऊ महिने लग्नसोहळ्यांना पूरकव्यवसायांवर गडांतर आले होते. त्यामुळे विवाह सोहळ्यांनिमित्ताने होणारी मोठी आर्थिक उलाढाल मंदावली होती.
कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज
नाशिक : ग्रामीण भागात थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे. भाजीपाला आणि टॉमेटो पिकावर थंडीचा अधिक परिणाम जाणवत आहे. काही ठिकाणी गव्हावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
गांधीनगरमधील पथदीप बंद
नाशिक : गांधीनगर परिसरातील अनेक पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या परिसरातील पथदीप त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. पथदीप बंद असल्याने रात्रीच्या वेळी या परिसरातून पायी जाणे धोकादायक ठरू लागले आहे.