पाटोदा : गेल्या काही दिवसांपासून पाटोदा परिसरात ढगाळ हवामान आहे. त्यात रब्बी पिकांना पोषक असलेली थंडी गायब झाल्याने कांदा व कांदा रोपावर मावा, तुडतुडे व करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हरभरा पिकावर अळीचे अतिक्रमण वाढले आहे. रब्बीच्या पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी वर्गाला सकाळ-संध्याकाळ अशी दोन वेळेस औषधांची फवारणी करावी लागत आहे.ऐन पिके काढणीच्या सुमारास परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने खरीप हंगामातील पिकांची वाताहत झाली. या परतीच्या पावसाने ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात लागवड केलेल्या कांदा पिकाचे व कांदा रोपे सडून गेल्यामुळे कांदा बियाणे व कांदा लागवडीसाठी एकरी पन्नास ते साठ हजार रुपयांचा खर्च वाया गेल्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न मानता पुन्हा नव्या उमेदीने भांडवल उभे करून रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली तसेच चार ते पाच हजार रुपये किलोचे महागडे कांदा बियाणे घेऊन कांदा लागवड केली.मात्र गेल्या काही दिवसांपासून रात्री थंडी, पहाटे दवबिंदू तर दिवसभर ढगाळ हवामान, तर कधी कडक ऊन असे संमिश्र वातावरण असल्याने कांदा पिकावर मावा, तुडतुडे तसेच करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, तर हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणावर अळीचा वावर वाढला आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकर्यांना औषध फवारणी करावी लागत असल्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. असेच वातावरण अजून काही दिवस राहिले तर रब्बी हंगामही वाया जाण्याची व मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:14 AM
पाटोदा : गेल्या काही दिवसांपासून पाटोदा परिसरात ढगाळ हवामान आहे. त्यात रब्बी पिकांना पोषक असलेली थंडी गायब झाल्याने कांदा ...
ठळक मुद्देथंडी गायब : हवामान बदलाचा फटका ; कांदा पिकावर मावा