नाशिक : कोरोनाचा कहर काहीसा कमी होत असताना जिल्ह्यातील सांधेदुखीचे प्रमाणदेखील कमी होऊ लागले आहे; मात्र सप्टेंबरपर्यंत सहा महिने घरातच थांबावे लागल्याने अनेक व्यक्तींना गुडघेदुखी तसेच वर्क फ्रॉम होममुळे मणकेदुखीच्या समस्यांनी ग्रासले होते; मात्र नोव्हेंबरपासून नागरिक घराबाहेर पडू लागल्यावर नागरिकांच्या गुडघेदुखीचे प्रमाण हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे.
कोरोनाच्या काळात घरातच थांबल्याने आणि खाण्याच्या पदार्थांमध्ये पिष्टमय आणि तळलेल्या पदार्थांचे प्रमाण वाढल्याने अनेकांचे पोट पुढे येणे, कंबर दुखणे, गुडघेदुखी असेही त्रास होऊ लागले. दिवसभर वर्क फ्रॉम होममध्ये व्यस्त आणि त्यानंतर रात्री मोबाइल, टीव्ही पाहण्यात दंग झालेल्या अनेकांना सर्व प्रकारच्या सांधेदुखीच्या व्याधींनी ग्रासले होते. अति खाणे, सतत बसून राहणं यामुळे शरीरातील चरबीच्या पेशी संख्येने व आकारमानाने दोन्ही प्रकारे वाढल्या होत्या. वाढत राहिलेलं वजन व चालण्याचा अभाव हे सांधेदुखीचं प्रमुख कारण आहे. रोज नियमितपणे ठराविक वेळेला, ठराविक ठिकाणी कमीत कमी अर्धा तास तरी व्यायाम करावा साधारणपणे दिवसाला १० हजार पावले चालली पाहिजेत. हल्ली आपल्या मोबाइलवर ॲप डाऊनलोड करून हे सहज मोजता येते. यामुळे सांध्यांना व स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो, ते मजबूत होतात, मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होऊन शरीर व मन दिवसभर प्रसन्न राहते, शिवाय ताणाचा निचराही होऊ शकतो.
इन्फो
व्याधी वाढण्याची कारणे
लॉकडाऊन उठल्यानंतर घराबाहेर पडण्याची मुभा मिळाली असली तरी मुळातच शारीरिक हालचालींचे प्रमाण घटले आहे. दारात उभ्या असलेल्या दुचाकी, चारचाकी गाड्या, चौकांमध्ये, नाक्यानाक्यावरील रिक्षा, त्यामुळे सर्वांचे चालणे अगदी अत्यल्प झाले आहे. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठीदेखील दुचाकी-चारचाकीचा वापर होत असल्याने चालण्याचा व्यायामपण बंद झालाय. या बदलत्या सवयी व बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या शहरी आयुष्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दैनंदिन जीवनात शारीरिक कामांचा व व्यायामाच्या अभावामुळेच अनेकांना गुडघेदुखी तसेच कंबरदुखीच्या व्याधींनी सतावले आहे.
कोट
गुडघेदुखी, सांधेदुखीची अशी घ्यावी काळजी
संधीवात असणाऱ्यांनी हातमाेजे, पायमोजे घालणे आवश्यक आहे. तसेच शरीर गरम राखण्याची दक्षता घ्यावी. त्याशिवाय आहारात कॅल्शियम तसेच डिंकाचे लाडू खाल्ल्यासदेखील फायदा होतो. तसेच अशा रुग्णांनी सूर्यप्रकाशाव्दारे व्हिटॅमिन डी वाढवण्याचा प्रयत्न करावा. तसेच दिवसभर किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा.
डॉ. उमेश कुलकर्णी, अस्थिरोग तज्ज्ञ