‘दलित वस्तीची कामे त्याच घटकांना द्या’
सिन्नर : पंचायत समितीमध्ये दलित वस्ती सुधार योजनेची कामे त्याच घटकांच्या लोकांना मिळण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे मऱ्हळ बुद्रूक येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर भालेराव यांनी केली आहे. दलित वस्ती सुधारणा योजनेची सर्व कामे ग्रामपंचायतींकडून संबंधित अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या लोकांना देण्यात यावी. त्याद्वारे अशा लोकांना रोजगार मिळणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबत आपल्या स्तरावर संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांना योग्य त्या सूचना करण्यात याव्या, अशी मागणी करण्यात आली आहे.
संत सेना महाराज मंदिराचे भूमिपूजन
सिन्नर : तालुक्यातील वावी येथे संत सेना महाराज मंदिर कामाचे भूमिपूजन पार पडले. समाजासाठी मंदिर उभे करून त्याचा संपूर्ण खर्च स्वत: करण्याचा मानस येथील नाभिक समाज संघटनेचे माजी जिल्हाप्रमुख सखाराम जाधव यांनी व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने येथील तुकाराम महाराज मंदिराशेजारील जागेत ह. भ. प. पांडुरंग महाराज गोसावी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी सरपंच कन्हैयालाल भुतडा, माजी सरपंच विजय काटे, कारभारी वेलजाळी, उपसरपंच मीना काटे, रामनाथ कर्पे, रामराव ताजणे, सर्जेराव वाजे, संतोष जोशी, संदीप राजेभोसले, विनायक घेगडमल, कैलास जाजू, संदीप भोसले, सचिन वेलजाळी, ज्ञानेश्वर खाटेकर, रमेश बिडवे, वाळिबा जाधव, अंबादास कदम, गणेश कदम, संदीप जाधव, संतोष कदम उपस्थित होते.