अझहर शेख, नाशिक : कुठल्याही जंगलात फिरताना किंवा गड-किल्ल्यांच्या भ्रमंतीवर जाताना तेथील जैवविविधतेला बाधा पोहचेल असे कृत्य टाळणे अत्यावश्यक असते, अन्यथा स्वत:वर संकट ओढावते. कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील कोथळे देवराईमधून भैरवगडावर पोहचलेल्या पुण्याच्या पर्यटकांसाेबत असाच काहीसा प्रसंग घडला. या पर्यटकांनी गडावर पाळापाचोळा काहीसा पेटवून धूर करण्याचा प्रयत्न केला अन् जवळच असलेल्या मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. घटनेची माहिती राजुर वन्यजीव विभागाला मिळताच वनपथकाने मदतीसाठी धाव घेत पर्यटकांना सुरक्षित पायथ्याशी आणले.
कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारणामध्ये प्रत्येक ऋुतूत भटकंती करण्याचा वेगळा आनंद असतो. या अभयारण्यात विविध गड-किल्ले, गर्द वृक्षराजी असून ट्रेकर्स, निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमींना ती नेहमीच खुणावते. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, राजुर वनपरिक्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्यावर नाशिक वन्यजीव विभागाचे नियंत्रण आहे.
राज्यप्राणी शेकरूच्या अधिवासासाठी प्रसिद्ध असलेल्या राजुर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोथळे देवराई ही तेथील स्थानिक लोकांनी राखलेले उत्तम जंगल आहे. या जंगलात भटकंती साठी रविवारी (दि.७) पुण्याचे दहा ते बारा पर्यटक आले होते. तेथून ते भैरवगडाच्या दिशेने दुपारी रवाना झाले. काही महिला पर्यटकांनी खालीच थांबणे पसंत केले. सहा ते आठ पर्यटक गडावर पोहचले. त्याठिकाणी त्यांना काही मधमाशा दिसल्या. यामुळे त्यांना पळवून लावण्यासाठी त्यांनी पाळापाचोळा जाळण्याची शक्कल लढविली. ही शक्कल मात्र त्यांच्या चांगलीच अंगलट आली. पाळापाचोळा पेटविताच धूरामुळे असुरक्षिततेची जाणीव मधमाशांना झाली आणि जवळच एका झाडावर असलेल्या पोळावरून मधमाशाचे मोठे मोहोळ उठले आणि पर्यटकांवर हल्ला चढविला. जीवाच्या आकांताने पर्यटक आरडाओरड करू लागले. त्यांच्यापैकी एका पर्यटकाने पुणे येथील ओंकार ओक रेस्क्यु समन्वयक यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली.
ओक यांनी राजुर वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे, भंडारदरा वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांच्याशी संपर्क करून घटना कळविली. माहिती मिळताच पडवळे यांनी वनपरिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक, वनमजुरांचे पथकासह पाण्याच्या बाटल्या, बिस्किटाचे पुडे वगैरे घेऊन भैरवगड गाठले. तातडीने मदतीसाठी १०८रूग्णवाहिकेला पाचारण केले. पथकाने गडावर मधमाशांच्या हल्ल्यात सापडलेल्या सहा पर्यटकांना सुरक्षित खाली आणून राजुर ग्रामिण रूग्णालयात हलविले.