मुंबईनाका परिसरात महामार्गाच्या समांतर रस्त्यावर शुक्रवारी उभी असलेली स्विफ्ट कारची (एमएच १५- एचजी २८६८) काच फोडून पल्सरवरुन आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तींनी कारची पाठीमागील दरवाजाची काच फोडली आणि कारमध्ये ठेवलेली १५ लाखांची रक्कम घेत पोबारा केल्याची घटना समोर आली होती. या घटनेवरून फिर्यादी मयूर राजेंद्र भालेराव (२५,रा. नावदरवाजा, तिवंधा चौक) याने दिलेल्या तक्रारीवरून मुंबईनाका पोलिसांकडून जबरी लुटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला. तसेच चार पथकेही संशयितांच्या शोधार्थ रवाना केली गेली. सर्वत्र नाकाबंदी करून संशयितांचा फिर्यादी भालेराव याने सांगितलेल्या वर्णनावरून शोध घेण्यास सुरुवात झाली; मात्र कोणत्याही पथकाच्या हाती कुठलाही सुगावा लागत नसल्याने पोलिसांना भालेराववर संशय आला. यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी भालेरावला पोलीस ठाण्यात बोलावून त्याची कसून चौकशी केली. यावेळी पोलिसांची दिशाभूल करत जबरी लूट झाल्याचा बनाव केल्याचे तपासात पुढे आले. शहरात कुठल्याहीप्रकारची पल्सर गँग नसून कोणीही दुचाकीने भरधाव येत कारची काच फोडून रक्कम लांबविली नसल्याचे स्पष्ट झाले. भालेराव व त्याचा मित्र संशयित राम शिंदे यांनी संगनमताने हा जबरी लुटीचा बनाव रचल्याचे उघड झाले असून पोलिसांनी भालेरावसह त्याच्या एका मित्राला ताब्यात घेतले आहे. उर्वरित दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
---इन्फो--
‘रोलेट गँग’वर कारवाई होणार का?
शहरात रोलेट चालविणारी टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय असून या टोळीकडून अशापध्दतीने आता पोलिसांचीही दिशाभूल करण्यापर्यंत मजल गेल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून उपायुक्त, सहायक आयुक्त यांना रोलेट गँगची शहरात रोवलेली पाळेमुळे उखडून फेकण्याचे आदेश देत फोफावणणाऱ्या गुन्हेगारीला वेळीच आळा घालण्याची मागणी नाशिककरांनी केली आहे.
---