पंचवटी : गंगाघाट परिसरातील अहल्याराम व्यायामशाळेबाहेर उभी केलेली दुचाकी अज्ञात व्यक्तीने जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुने नाशिक येथील प्रशांत कोठेकर यांनी रविवारी (दि़१६) रात्री त्यांची होंडा युनिकॉर्न दुचाकी क्रमांक (एमएच १५ डीपी ८८४९) गंगाघाटावरील अहल्याराम व्यायामशाळेजवळ उभी केली होती़ सोमवारी (दि़१७) पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने ही दुचाकी पेटवून दिली. परिसरात काहीतरी वस्तू पेटत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी पेटलेली दुचाकी विझविण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, अज्ञात व्यक्ती कुरापत काढून दुचाकी पेटवून देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. कोठेकर यांची दुचाकी जाळपोळ करीत असताना संशयिताने शेजारी उभ्या दुचाकींवरही पेट्रोल शिंपडल्याचे नागरिकांनी सांगितले. (वार्ताहर)
गंगाघाटावर दुचाकी जाळपोळीची घटना
By admin | Published: October 18, 2016 3:05 AM