मालेगाव : येथील छावणी पोलीस ठाण्यात २००४मध्ये कार्यरत असताना घरफोडीच्या गुन्ह्यात जप्त केलेले २९ ग्रॅम सोन्याची लगड रुपये १५ हजार किमतीचा मुद्देमालाचा अपहार केल्याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक व सेवानिवृत्त लेखनिक हवालदाराविरुद्ध छावणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. २७ मार्च २००४ रोजी हा प्रकार घडला. पोलीस निरीक्षक अंकुश इंगळे यांनी काल फिर्याद दिली. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब श्यामराव पाटील, रा. चित्तोडरोड, धुळे व सेवानिवृत्त लेखनिक पोलीस हवालदार पुरुषोत्तम रामदास हिरे, रा. कलेक्टरपट्टा हे छावणी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यावेळी उपनिरीक्षक नानासाहेब पाटील यांनी तपासाला आलेल्या गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल एक २९ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड २००४च्या बाजारभावाप्रमाणे किंमत रुपये १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तो लेखनिक हवालदार पुरुषोत्तम हिरे यांच्याकडे रजिस्टरला नोंद करण्याची जबाबदारी असताना पुरुषोत्तम हिरे यांनी सदर मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलीस ठाणे अभिलेखावर नोंदविण्याची जबाबदारी असताना दोघांनी आपल्या पदाचा गैरउपयोग करून सदरची जबाबदारी एकमेकांवर ढकलून अभिलेखावर मुद्देमालाची नोंद न करता अपहार केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे करीत आहेत. (प्रतिनिधी)
छावणी पोलीस ठाणे : २००४मध्ये घडलेली घटना
By admin | Published: January 08, 2015 12:04 AM