लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गोदावरी तुटीच्या खोऱ्यात तब्बल १२ टीएमसी पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी पेठ तालुक्यातील दमनगंगा नदीवर एकदरे येथे ५ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे धरण बांधण्यात येणार आहे. आंतरराज्य नदीजोड योजनेत गारगई-वैतरणा-देवनदी व दमणगंगा-एकदरे लिंक योजनेचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने गारगई-वैतरणा-देवनदी प्रकल्पासाठी तसेच दमणगंगा-एकदरे प्रकल्पासाठी ४१ कोटींची तरतूद केली आहे. शासनाने दमणगंगा पिंजाळ योजनेंतर्गत महाराष्ट्र व गुजरातसाठी किती पाणी उपलब्ध होणार आहे, यासाठी नियोजन व जलविज्ञान केंद्राचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली पाच मुख्य अभियंत्यांची समिती गठित केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसारच आता आंतरराज्य नदीजोड योजनेत गारगई-वैतरणा-देवनदी योजनेचा व दमणगंगा-एकदरे लिंक योजनेचा समावेश करण्यात आला असून, देवनदी योजनेसाठी २३ कोटी ९३ लाख तर दमणगंगा-एकदरे लिंक योजनेसाठी १८ कोटींची तरतूद चालू अर्थसंकल्पात धरण्यात आली आहे. या दोन्ही योजनांचा समावेश राष्ट्रीय नद्याजोड योजनेत व्हावा, यासाठी राष्ट्रीय जलविकास अभिकरण संस्थेकडे महाराष्ट्र शासनाने प्रस्ताव सादर केला आहे.या प्रकल्पांमुळे उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दमणगंगा पिंजाळ लिंक योजनेच्या मंजुरीतून गुजरातला मोठ्या प्रमाणावर पाणी जात असल्याचा आरोप करीत नाशिकच्या जलचिंतन संस्थेने मुंबईला आझाद मैदानावर उपोषण केले होते. तसेच यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी राज्य शासन व केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित करीत हे पाणी महाराष्ट्रातच ठेवण्याबाबत भूमिका मांडली होती. साडेआठशे कोटींचा प्रकल्पएकदरे येथे प्रस्तावित धरणावर सुमारे ८५० कोटींचा खर्च अपेक्षित असून, सुमारे आठ किलोमीटरचा बोगदा करून एकदरे धरणातून उर्ध्वसिंचनाद्वारे हे पाणी उचलून थेट गंगापूर धरणात टाकण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव व नियोजन जलसंपदा विभागाने सविस्तर अहवालाद्वारे तयार केले आहे.साडेपाच किमीचा बोगदाएकदरे धरणापासून गंगापूर धरणापर्यंत सुमारे साडेआठ किलोमीटरपर्यंत ऊर्ध्वसिंचनाद्वारे पाणी गंगापूर धरणात सोडण्यात येणार आहे. त्यात दिंडोरी तालुक्यातील काही गावांपासून नाशिकच्या गंगापूर धरणापर्यंत सुमारे साडेपाच किलोमीटरचा बोगदा (भुयार) असणार आहे. या बोगद्यातून पाणी थेट गंगापूर धरणात सोडण्यात येईल.
राष्ट्रीय नद्याजोड योजनेत देवनदी-एकदरेचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 1:24 AM